esakal | कृषी कायद्याविरोधात विदर्भातही चक्काजाम; शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेक संघटना रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Many organizations on the streets in support of farmers

चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा विविध संघटनांनी जिल्हाभर आंदोलने केली. चंद्रपूर वेकोलि क्षेत्रात कार्यरत चार कामगार संघटनांनी एकत्रित येत मार्गावर चक्काजाम केला. कोरपना तालुक्‍यात जनविकास सेनेच्या वतीने कृषी विधेयकाची होळी करण्यात आली.

कृषी कायद्याविरोधात विदर्भातही चक्काजाम; शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेक संघटना रस्त्यावर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून ते त्यांनी मागे घ्यावेत या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज, शनिवारी या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केले. तसेच देशभर आंदोलन करण्याचे आवाहन सुद्धा केले होते. या आंदोलनाला विदर्भातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन केले, तर अनेक ठिकाणी विविध संघटनांनी मोर्चे काढले.

नागपूर येथील इंदोरा चौकातही चक्काजाम आंदोलन करण्यात आले. विविध व्यावसायिक, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी त्यात सहभाग नोंदविला. दुपारीच आटोमोटीव्ह चौकात आंदोलक एकत्र आले. दुपारी १२ च्या सुमारात हातात तिरंगी झेंडे आणि संघटनांचे बॅनर घेऊन आंदोलकांनी आगेकूच केली.
अमरावतीत नागपूर महामार्गावर किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्त्वात विविध संघटनांनी चक्काजाम आंदोलन केले.

अधिक वाचा - मातृत्व अनुभवण्यापूर्वीच झाला बाळाचा मृत्यू, महिलेचं कृत्य पाहून उपस्थितांचेही पाणावले डोळे

आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती. सोबतच चांदूरबाजार येथे राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व भारतीय विद्यार्थी मोर्चाने आंदोलन केले. तिवसा येथे अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर युनियन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिवसा शहराच्या पेट्रोलपंप चौकात तसेच दर्यापूर येथे संयुक्त किसान आघाडीतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केले.

चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा विविध संघटनांनी जिल्हाभर आंदोलने केली. चंद्रपूर वेकोलि क्षेत्रात कार्यरत चार कामगार संघटनांनी एकत्रित येत मार्गावर चक्काजाम केला. कोरपना तालुक्‍यात जनविकास सेनेच्या वतीने कृषी विधेयकाची होळी करण्यात आली. तसेच वरोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलन केले. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथेही विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

जाणून घ्या - काळजात धस्स करणारी हिंगणघाटची घटना; काय घडले होते अंकितासोबत गतवर्षी ३ फेब्रुवारीला

वर्ध्यात रोखला नागपूर-तुळजापूर महामार्ग

वर्धेत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात पवनार येथील चौरस्त्यावर शेतकऱ्यांनी ‘रास्ता रोको’ केला. शेतकरी कामगार आंदोलन समन्वय समितीतर्फे शेतकरी पवनार येथे रस्त्यावर उतरले होते. हातात तिरंगा झेंडा घेऊन आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महिलांचाही सहभाग होता. जिल्ह्यात हिंगणघाट, आष्टी, जाम येथेही आंदोलन करण्यात आले.

कायदे रद्द न घेल्यास आरपारची लढाई

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील राष्ट्रीय महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी चक्काजाम केला. कृषी कायदे परत न घेतल्यास आरपारची लढाई लढली जाईल, असा इशारा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिला. शनिवारी दुपारी १ वाजता किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात शेतकरी राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले. याठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास एक तास चक्काजाम केल्यानंतर पोलिसांनी किशोर तिवारी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना अटक केली.