बसअभावी अनेक विद्यार्थिनी शाळा सोडण्याच्या मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

गडचिरोली : विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मानव विकास मिशनच्या बसेस विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने अनेक विद्यार्थिनी शाळेला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानव विकास मिशनच्या बसचा भर प्रवासी वाहतुकीवर दिसून येत असल्याने त्याचा फटका विद्यार्थिनींना बसत आहे.

विशेषतः ग्रामीण भागात हा प्रकार अधिक प्रमाणात दिसून येत आहे. अहेरी तालुक्‍यातील आलापल्ली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने एटापल्ली व भामरागड मार्गावरील अनेक गावांतील विद्यार्थी मानव विकास मिशनच्या बसेसने तेथील शाळेत ये-जा करीत असतात. परंतु अनेकदा बसेस वेळेवर येत नाहीत. हीच समस्या धानोरा येथेही दिसून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी अनेकदा जिल्हा प्रशासन व गडचिरोली येथील आगार व्यवस्थापकांकडे निवेदन दिले; परंतु काहीच फायदा झाला नाही. 31 जुलैला आलापल्ली बसस्थानकावर अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी संध्याकाळी पावणेपाच वाजता आपल्या गावी जाण्यासाठी आले. 5.10 वाजता एटापल्लीकडे जाणारी नियोजित बस होती. ही बस अहेरी स्थानकावरून सोडण्यात येते. परंतु दोन तास होऊनही बस येईना. त्यामुळे शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापकही विद्यार्थी कसे जातील, या चिंतेने बस स्थानकावर आले. शेवटी 7.15 वाजता दुसऱ्या बसने विद्यार्थ्यांना रवाना करण्यात आले. बसेसच्या वेळा ठरलेल्या आहेत. परंतु त्या कधीच वेळेवर येत नाहीत. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेला बुट्टी मारावी लागते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many students on their way to school leaving on the bus