एटापल्ली तालुक्यात आढळली माओवाद्यांची पोस्टर व बॅनर

मनोहर बोरकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशन हद्दीतील जांबिया गावांजवळ मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून शासनाचा धिक्कार करा, माओवादी चळवळीत मरण आलेल्या देशव्यापी योध्याना आदरांजली अर्पण करावे असे आवाहन जनतेला केले आहे.
 

एटापल्ली (गडचिरोली)- तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशन हद्दीतील जांबिया गावांजवळ मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून शासनाचा धिक्कार करा, माओवादी चळवळीत मरण आलेल्या देशव्यापी योध्याना आदरांजली अर्पण करावे असे आवाहन जनतेला केले आहे.

दरवर्षी, 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षल चळवळीकडून हुतात्मा सप्ताह साजरा करण्यात येतो. यावेळी चळवळ स्थापनेपासून संघर्षात मारले गेलेल्या माओवाद्यांची जंगल परिसरात स्मारक उभारून त्यांना आदरांजली अर्पण करणे, चळवळ विरोधातील टार्गेट असणारे नागरिकांचा पोलिस खबरी असल्याच्या संशय व्यक्त करून खात्मा करणे, प्रभावी क्षेत्रात शासकीय मालमत्तेचे नुकसान करून दहशत निर्माण करणे, विकास कामांवरील वाहने व साहित्यांची नासाधुस, जाळपोळ करणे, अशी कामे केली जातात.

सदर बॅनर (ता. 2) गुरुवारी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आले, शासनाकडून नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध युद्ध उभारावे असाही मजकूर या बॅनरमध्ये लिहिला आहे. गेले काही दिवस माघारलेले नक्षल चळवळ पोस्टर बॅनरच्या माध्यमाने डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, पोलीस प्रशासन दक्ष असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सदर बॅनर व पोस्टरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी असा उल्लेख करण्यात आलेला आहे.

Web Title: Maoists posters and banners found in Etapalli taluka