नागपूर शैक्षणिक हब म्हणून जगाच्या नकाशावर

SYMBIOSIS.jpg
SYMBIOSIS.jpg

नागपूर : आजपर्यंतचा इतिहास पाहता नामवंत संस्थांनीच मोठी शहरे, औद्योगिकरण व सामाजिक, सांस्कृतिक चळवळींना आकार दिला आहे. विद्यापीठ मानव संसाधनाची निर्मिती करतात आणि त्याद्वारे शहराच्या विकासाला चालना मिळते. नागपूरची वाटचाल आता कार्गो, लॉजिस्टिक आणि एव्हिएशन हब होण्याकडे आहे. त्यातच आयआयएम, एम्स, ट्रिपल आयटीसारख्या शैक्षणिक संस्थांसोबत सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमुळे नागपूर आता "शैक्षणिक हब' म्हणून जगाच्या नकाशावर आले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  वाठोडा येथे सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या उद्‌घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर व मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, युवाशक्‍ती हे भारताचे बलस्थान आहे. या शक्‍तीला बलशाली करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर देणे गरजेचे आहे. देशात औद्योगिकरणाचा वेग वाढत असून नागपूरही आता कार्गो, लॉजिस्टिक, एव्हिएशनबरोबरच शैक्षणिक हब म्हणून जगाच्या नकाशावर आले आहे. जगाच्या सीमारेषा फुसट होत असून विनोबांची "जय जगत' संकल्पना पुढे नेत "वसुधैव कुटुंबकम'ची भावना जोपासली पाहिजे. सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी नागपूर येथे कार्यरत होत असून नागपूरकरांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. विद्युत गतीने तयार झालेले हे भव्यदिव्य कॅम्पस स्वप्नवत विद्यापीठ ठरेल. यावेळी डॉ. शां. ब. मुजुमदार यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांनी आभार मानले.

25 टक्के विदर्भासाठी राखीव : गडकरी
सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत आहे. सिम्बॉयसिसमधील 25 टक्के जागा या यापुढे विदर्भासाठी राखीव राहतील, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपूर येथे वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीचे "क्‍लस्टर पार्क' उभारण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घ्यावा, केंद्रशासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असेही गडकरी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com