कीटअभावी स्वाईन फ्लू लॅब बनली शोभेची इमारत

प्रवीण खेते 
रविवार, 11 मार्च 2018

गतवर्षी एनआयव्हीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वाईन फ्लूच्या स्वतंत्र लॅबसाठी मान्यता दिली आहे. परंतु, कीट उपलब्ध नसल्याने स्थानिक पातळीवर नमुन्यांची तपासणी करणे अशक्य आहे. कीट मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकाेला

अकाेला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) स्वाईन फ्लूच्या लॅब तयार झालेली आहे. या लॅबसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले. परंतु, ही लॅब चालविण्यासाठी आवश्‍यक ती कीटच येथे उपलब्ध नाही. त्यामुळे ही लॅब गेल्या सहा महिन्यांपांसून शोभेची इमारत बनली आहे. परिणामी, येणारे नमुने तपासणीसाठी नागपुरात पाठविण्यात येत असल्याची परिस्थिती येथे आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलकडे वाटचाल करणाऱ्या महाविद्यालयाचा हा प्रकार रुग्णांसाठी त्रासदायक ठरत आहे, हे विशेष.

गत वर्षी जिल्ह्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले हाेते. सात ते आठ महिन्यात तब्बल २२ रुग्ण स्वाईन फ्लूचे बळी गेले हाेते. शिवाय, संशयीत रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत हाेती. रुग्णाला स्वाईन फ्लू आहे की, नाही याची पुष्टी करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने एनआयव्हीच्या नागपूर किंवा पुणे लॅबमध्ये पाठविण्यात येतात. परंतु, तपासणीचा अहवाल यायला तीन ते चार दिवस लागत असल्याने रुग्णाची प्रकृती आणखी गंभीर हाेवून, ते दगावण्याचे प्रमाण वाढले हाेते. अशा परिस्थितीत अकाेल्यातच स्वाईन फ्लू स्वतंत्र लॅब असावी यासाठी हालचालींना सुरुवात करण्यात आली हाेती.

त्या अनुषंगाने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) पथकाने जीएमसीला भेट दिल्यानंतर स्वतंत्र लॅबसाठी मान्यता दिली. लॅबसाठी स्वतंत्र व्यवस्था केल्यावर एनआयव्हीतर्फे जीएमसीच्या एका पथकाला स्वाईन फ्लूच्या नमुन्यांची तपासणी कशी करावी, या संदर्भात प्रशिक्षणही दिले. या प्रक्रियेला सहा महिने उलटून गेले, तरी एनआयव्हीतर्फे लॅबसाठी आवश्यक कीट अद्यापही उपलब्ध करून देण्यात आली नाही. परिणामी येथील लॅब केवळ नावालाच राहीली असून, संशयीत रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात येतात.

कीटसाठी लाखाेंच्या निधीची गरज
स्वाईन फ्लूच्या लॅबमध्ये आवश्यक असलेली कीट महागळी असून, त्याची किंमत लाेखाेंच्या घरात जाते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने यासाठी एनआयव्हीकडे मागणी केली आहे. परंतु, एनआयव्हीने याबाबत सकारात्मक भूमीका घेतलेली दिसत नाही. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने कीटसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

राज्यातील तिसरी, तर विदर्भातील दुसरी लॅब
स्वाईन फ्लूच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी राज्यात एनआयव्हीच्या दाेन लॅब आहेत. यामध्ये एक पुण्याला, तर दुसरी नागपूरला आहे. तिसऱ्या लॅबसाठी अकाेल्याला मान्यता मिळाली आहे.

गतवर्षी एनआयव्हीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वाईन फ्लूच्या स्वतंत्र लॅबसाठी मान्यता दिली आहे. परंतु, कीट उपलब्ध नसल्याने स्थानिक पातळीवर नमुन्यांची तपासणी करणे अशक्य आहे. कीट मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकाेला

Web Title: Marathi news Akola news swine flu lab