तीन दिवसाआड दोन तास पाणी!

विवेक मेतकर 
बुधवार, 17 जानेवारी 2018

महान धरणातून शहराला मिळणारे पाणीच अपुरे असल्याने उद्योगांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. एेन हिवाळ्यात उद्योगाला भेडसावणारा पाणीप्रश्न पुढील दोन-तीन महिन्यात उग्र होवू शकतो. कायमस्वरुपी उपाययोजना केल्यास उद्योगाला बळकटी मिळेल.
- विजय पनपालीया, अध्यक्ष, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, अकोला.

अकोला : जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने यंदा औद्योगीक वसाहतीमधील शेकडो उद्योगांवर ‘संक्रांत’ आली आहे. कुंभारी तलावातून होत असलेला जलसाठा संपत आल्याने एमआयडीसीच्या अभियंतांनी पाणी पुरवठ्यात कपात करून आठवड्यातून तीन दिवस फक्त दोन तास होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर उद्योगांची तहानही भागत नाही.

यंदा अकोल्यात पाऊस नसल्याने पीक तर गेलेचं. सोबतच पिण्याच्या पाण्याचीही नवी समस्या निर्माण झाली आहे. शहराला पाणी मिळणे कठीण झाले आहे. जिल्हातील धरणांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे ६४ खेडी खांबोरा प्रकल्पातून होणारा एमआयडीसीचा पाणीपुरवठा आधीच बंद करण्यात आला. त्यामुळे अकोला एमआयडीसीने कुंभारीच्या तलावातून पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, कुंभारी तलावाचा जलसाठाही आता संपुष्टात आला असून त्यामध्ये बोअर करून तात्पुर्त्या स्वरुपात आठवड्यातून तीन दिवस तीन तास पाणी देत असल्याचा एमआयडीसी प्रशासनाने प्रयोग केला. प्रत्यक्षात मात्र दोन तासाच पाणीपुरवठा केल्या जात असल्याचे दिसून आले. यामुळे अकोल्यातील शेकडो उद्योगांवर संक्रांत येण्याची शक्यता आहे.

उद्योगमंत्र्यांचे आश्वासन
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट स्थानिक उद्योजकांनी घेतल्यानंतर महान धरणातून वेगळी जलवाहिनी किंवा वान प्रकल्पातून स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. या दिर्घकालीन उपाययोजना अमलात येण्यास अजून बराच वेळ असल्याचे एेन हिवाळ्यात उद्योगावर आलेल्या या पाणीप्रश्नामुळे २५० ते ३०० उद्योग संकटात आले आहेत.

आमदार बाजोरिया यांचेही प्रयत्न
अकोला एमआयडीसीला कायम पाणी टंचाईचा फटका बसत आला आहे. त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या संदर्भात मुंबईतही बैठक होणार आहे.

महान धरणातून शहराला मिळणारे पाणीच अपुरे असल्याने उद्योगांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. एेन हिवाळ्यात उद्योगाला भेडसावणारा पाणीप्रश्न पुढील दोन-तीन महिन्यात उग्र होवू शकतो. कायमस्वरुपी उपाययोजना केल्यास उद्योगाला बळकटी मिळेल.
- विजय पनपालीया, अध्यक्ष, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, अकोला.

Web Title: Marathi news Akola news water supply in Akola