पक्ष्यांचा जीव घेणारा १३५ रिल मांजा पकडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

पक्षी व मानवी जिवांना धोका असल्याने घाऊक, किरकोळ व्यापारी व साठवणूकदार यांच्याकडून नायलॉनच्या मांजाची साठवणूक व विक्री होत असल्यास कारवाई करण्याचे वन्यजीव संरक्षण अधिकाऱ्यांचे आदेश आहेत. शहरात मोची गल्लीत मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सवाकरिता पतंगासोबतच नायलॉन मांजाची रिल विक्री केली जात होती.

खामगाव : आकाशाला गवसणी घालणाऱ्या विविध पक्ष्यांसाठी मारक ठरणारे तसेच मानवालाही हानिकारक असलेला मांजा विक्रीवर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री सुरू आहे. या विक्रीला प्रतिबंध घालण्याकरिता वन्यजीव विभाग व पोलिसांनी मोची गल्लीतील चार दुकानांवर बुधवारी संयुक्त कारवाई केली. यावेळी ४६ हजार ३५० रुपयांचा १३५ नायलॉनचा घातक मांजा जप्त करून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

पक्षी व मानवी जिवांना धोका असल्याने घाऊक, किरकोळ व्यापारी व साठवणूकदार यांच्याकडून नायलॉनच्या मांजाची साठवणूक व विक्री होत असल्यास कारवाई करण्याचे वन्यजीव संरक्षण अधिकाऱ्यांचे आदेश आहेत. शहरात मोची गल्लीत मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सवाकरिता पतंगासोबतच नायलॉन मांजाची रिल विक्री केली जात होती. याची माहिती समजल्यानंतर पोलीस व वन्यजीव विभागाने मोची गल्लीतील चार दुकानांवर धाडी टाकल्या. पवन चंपालाल चव्हाणकडून ३० मोठा व १६ नग लहान मांजा (किंमत १६ हजार), सुनील अमरचंद चव्हाणकडून २४ नग मोठा व १२ नग लहान मांजा (किंमत १२ हजार ६००), सुरेश फकिरचंद चव्हाण याच्याकडून २० नग मोठा व १३ नग लहान मांजा (किंमत ११ हजार २५०) आणि नारायण चंपालाल चव्हाणजवळून लहान, मोठा असा २० नग मांजा (किंमत ६ हजार ५०० रुपये) असा १३५ नग मांजा जप्त करण्यात आला. या आरोपींविरुद्ध वनपाल अनिल विनकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणेदार यू.के.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय लांडे, पोहेकॉ अनिल देशमुख, शांताराम खाडपे, सूरज राठोड, दीपक राठोड, जितेश हिवाळे, सुनील राऊत यांच्यासह वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. 

Web Title: Marathi news Buldhana news kite manja