धर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन - चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नागपूर - धर्मा पाटील यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या सात दिवसांत 199 हेक्‍टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जमिनीचे फेरमूल्यांकन करताना अंदाज चुकला असेल, तर पाटील यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देण्यात येईल, असे आश्‍वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. तत्कालीन प्रशासनाने घातलेल्या घोळामुळे पाटील यांना आत्महत्या करावी लागली, असाही आरोप त्यांनी नाव न घेता कॉंग्रेसवर केला. 

औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्यातील मोजे विखरण येथील जमिनी संपादित केल्या होत्या. यात धर्मा पाटील यांच्याही जमिनीचा समावेश होता. त्यांच्या दोन हेक्‍टर बागायती जमिनीसाठी चार लाख तीन हजार रुपयांचा मोबादला देण्यात आला होता. हा मोबदला अत्यंत अल्प असून शेजारच्या जमिनींना कोट्यवधी रुपये दिल्याचे धर्मा पाटलांचे म्हणणे होते. यात मोठ्या प्रमाणात घोळ घालण्यात आला असून, दलालांच्या जमिनींना जादा मोबदला देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे होते. अत्यल्प मोबदला दिल्याने धर्मा पाटील यांनी मंत्रालयाच्या दारात विष प्राशन केले होते. रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. ऊर्जामंत्र्यांनी तातडीने आज सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन उपरोक्त माहिती दिली. 

जमिनीचे चुकीचे फेरमूल्यांकन झाल्याने मोबदला कमी मिळाल्याची पाटील यांची तक्रार होती. त्याची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करत आहे. येत्या सात दिवसांत चौकशी पूर्ण होईल. 199 हेक्‍टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. धर्मा पाटील यांच्या जमिनीसह अन्य जमीनधारकांना सानुग्रह अनुदान देता येईल का, याची चाचपणी करण्याकरिता अहवाल मागितला आहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन 2009 ते 2015 या काळात झाले असून, त्याच काळात पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगून यासाठी कॉंग्रेसला जबाबदार धरले. 

Web Title: marathi news Chandrasekhar Bavankule dharma patil suicide case