लोकसभा व विधानसभा निवडणूक राज्यात एकत्र?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

नागपूर - डाव्यांच्या ताब्यात असलेला त्रिपुराचा गड सर केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. जनतेमध्ये मोदीलाटेचा प्रभाव कायम असल्याने याचा फायदा घेण्यासाठी एकूण आठ राज्यांतील विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक एकत्रित घेण्याचा विचार भाजपतर्फे केला जात आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल तातडीने नागपूर गाठले आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून एकापाठोपाठ एक राज्ये भाजपच्या ताब्यात येऊ लागली आहेत. डाव्यांचा गड समजल्या जाणाऱ्या त्रिपुरात भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला आणि ख्रिश्‍चनबहुल नागालॅंडमध्येही मोठी मुसंडी मारली. येथे मित्रपक्षाच्या सहकार्याने सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने दावा केला आहे. सध्या २१ राज्यांत भाजपची सत्ता आहे आणि एकेकाळी सर्वाधिक मोठा पक्ष असलेला काँग्रेस चारच राज्यांत सत्तेवर आहे. मोदींच्या चार वर्षांच्या कार्यकाळात फक्त दिल्ली आणि पंजाब ही दोनच राज्ये भाजपला जिंकता आली नाहीत. 

मोदी यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विविध पक्षांची महाआघाडी तयार करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. विरोधक एकत्र झाल्यास त्याचा फटका भाजपला बसू शकतो. यामुळे त्यांना गाफील ठेवून लोकसभा आणि ज्या राज्यांची विधानसभेची मुदत संपत आली आहे, तेथील निवडणुका एकत्रित घेण्याचे प्रयत्न भाजपने चालविले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मागेपुढे एकूण आठ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. यात महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. भाजपच्यादृष्टीने ही राज्ये महत्त्वाची आहेत. काही राज्यांना मुदतवाढ, तर काही राज्यांची विधानसभा सहा महिने आधीच बरखास्त करून लोकसभेसोबत निवडणूक घेण्याचा विचार केला जात आहे. 

संघाची साथ लाभल्यास...
संघाची साथ लाभल्यास डाव्यांच्या गडातही मुसंडी मारता येते, हे त्रिपुरा व नागालॅंडच्या निवडणुकीने सिद्ध झाले आहे. यामुळे संघाचा होकार मिळविण्यासाठी अमित शहा यांनी सरसंघचालकांशी चर्चा केल्याचे समजते. दोघांच्या भेटीतील तपशील बाहेर आला नसला, तरी भाजप आणि संघाच्या वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.

Web Title: marathi news loksabha vidhasabha election maharashtra