शंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू !

मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

आयएसआय मार्कचे स्टिकर 
रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या सर्वच हेल्मेटवर आयएसआयचे स्टिकर चिटकवले असते. स्टिकरचा गठ्ठाच विक्रेत्यांकडे असतो. ग्राहकाने हेल्मेट खरेदी केल्यावर ते चिटकवले जाते. स्वस्तःत मिळत असल्याने ग्राहक सुखावतो आणि पोलिसांनाही कारवाई करता येत नाही. 

नागपूर : तीन दिवसांपूर्वी अजनी रेल्वे स्थानकासमोर अपघातात हेल्मेट तडकल्याने डोक्‍याला जबर दुखापत होऊन एका युवकाचा मृत्यू झाला. यामुळे टुकार हेल्मेटचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. गल्लोगल्ली फुटपाथवर हेल्मेटची दुकाने थाटली आहेत. हे हेल्मेट डोक्‍याचे संरक्षण करण्याऐवजी फक्त पोलिसांपासूनच बचाव करीत असतानाही कोणीच कारवाई करीत नाही.

वाहनचालकांच्या जिवाशी खेळणारा धंदा सुरू असूनही पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासन फक्त बघ्याची भूमिका बजावत असल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

शहरातील अनेक वाहनचालकांच्या डोक्‍यात केवळ 100 रुपये किमतीचे हेल्मेट दिसते. फक्‍त पोलिसांनी दंडात्मक कारवाई करू नये, म्हणून ते हेल्मेट घालतात. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी दुचाकीचालक रस्त्यावरून हेल्मेट विकत घेतात. त्या हेल्मेटवर "आयएसआय' होलोग्राम नसतो. प्लॅस्टिकपासून बनविलेले हलक्‍या दर्जाचे हेल्मेट रस्त्यावर विक्रीस उपलब्ध असतात. 100 रुपयांपासून 1 हजार रुपयांपर्यंत हेल्मेट रस्त्यावर विकले जातात. हेल्मेट विक्रेते कोणतेही बिल किंवा वॉरंटी कार्डही देत नाही. त्यामुळे वजनाने हलके आणि निकृष्ट दर्जाचे प्लॅस्टिक वापरल्याने हेल्मेट तुटण्याचे प्रमाणही जास्त आहे. हातातून खाली पडल्यानंतही हेल्मेटला तडे जाऊ शकतात, अशी स्थिती रस्त्यावरील हेल्मेटची असते.

हेल्मेट घेताना वाहनचालक केवळ वाहतूक पोलिसांची भीती मनात बाळगतो. त्यामुळे पोलिसांनी पावती फाडण्यासाठी थांबवू नये म्हणून रस्त्यावरील हलक्‍या दर्जाचे हेल्मेट घालण्यास वाहनचालक पसंती देतात. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने हेल्मेटचे मनमानी दर आणि काळ्या बाजारावर अंकुश लावण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आतापर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे आयएसआय मार्कच्या बनावट हेल्मेटच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढत आहे. हेल्मेटची गुणवत्ता आणि किंमत यासाठी जबाबदार विभाग सुस्त असून, त्यामुळे रस्त्यावर हेल्मेट विक्रेत्यांची चांदी होत आहे. 

संबंधित प्रशासनाची भूमिका काय? 
हेल्मेट सक्तीची आवई उठल्यानंतर हेल्मेट विक्रीचे शहरात पीक आले. रस्त्यावर धडाक्‍यात हेल्मेट विक्री सुरू आहे. ही विक्री अधिकृत आहे काय? रस्त्यांवरील हेल्मेट अधिकृत आहेत काय? आयएसआय प्रमाणित नसणारे हेल्मेट विक्री करणे गुन्हा ठरत नाही काय? असे प्रश्‍न यामुळे उपस्थित झाले आहेत. वाहतुकीची काळजी करणारे पोलिस व वजनमापे विभागांच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. 

आयएसआय मार्कचे स्टिकर 
रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या सर्वच हेल्मेटवर आयएसआयचे स्टिकर चिटकवले असते. स्टिकरचा गठ्ठाच विक्रेत्यांकडे असतो. ग्राहकाने हेल्मेट खरेदी केल्यावर ते चिटकवले जाते. स्वस्तःत मिळत असल्याने ग्राहक सुखावतो आणि पोलिसांनाही कारवाई करता येत नाही. 

Web Title: Marathi News Low quality helmet selling on footpath