आट्यापाट्याने दिली आयुष्याला नवी दिशा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

नागपूर - खेळाडू म्हणून त्यांना अपेक्षेप्रमाणे भरारी घेता आली नाही. मात्र, प्रशिक्षक, क्रीडा संघटक व मार्गदर्शक बनून त्यांनी राष्ट्रीय दर्जाचे शेकडो खेळाडू तयार केले. त्यांच्या तालमीत घडलेल्या असंख्य खेळाडूंनी देशभरातील स्पर्धा गाजवून उपराजधानीचा ठसा उमटविला. त्यांच्या मेहनत व योगदानामुळे आट्यापाट्यासारख्या दुर्लक्षित खेळाला नवी ऊर्जा मिळाली, त्यांच्या प्रेरणेमुळे मोठ्या प्रमाणावर खेळाडू या खेळाकडे वळलेत. खेळ आणि खेळाडूंसाठी झटणाऱ्या या व्यक्‍तीचा राज्य शासनाने नुकताच उत्कृष्ट संघटक व मार्गदर्शक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. 

नागपूर - खेळाडू म्हणून त्यांना अपेक्षेप्रमाणे भरारी घेता आली नाही. मात्र, प्रशिक्षक, क्रीडा संघटक व मार्गदर्शक बनून त्यांनी राष्ट्रीय दर्जाचे शेकडो खेळाडू तयार केले. त्यांच्या तालमीत घडलेल्या असंख्य खेळाडूंनी देशभरातील स्पर्धा गाजवून उपराजधानीचा ठसा उमटविला. त्यांच्या मेहनत व योगदानामुळे आट्यापाट्यासारख्या दुर्लक्षित खेळाला नवी ऊर्जा मिळाली, त्यांच्या प्रेरणेमुळे मोठ्या प्रमाणावर खेळाडू या खेळाकडे वळलेत. खेळ आणि खेळाडूंसाठी झटणाऱ्या या व्यक्‍तीचा राज्य शासनाने नुकताच उत्कृष्ट संघटक व मार्गदर्शक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. 

नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून (एनएसएसएम) अलीकडेच निवृत्त झालेले डॉ. अशोक पाटील यांनी आपले अख्खे आयुष्य आट्यापाट्यासारख्या मातीतल्या खेळासाठी वाहिले. स्वत: राष्ट्रीय दर्जाचे आट्यापाट्या खेळाडू राहिलेले डॉ. पाटील यांना लवकर नोकरी लागल्याने उंच झेप घेता आली नाही. पण, खेळाडू म्हणून राहिलेले स्वप्न त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेकडो दर्जेदार खेळाडू घडवून जिद्दीने पूर्णत्वास नेले.

त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या असंख्य खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धांमध्ये देशभर निर्माण केला. केवळ आट्यापाट्याच नव्हे, बॉलबॅडमिंटन, आर्चरी, ॲथलेटिक्‍स व आर्चरीतही त्यांच्या शिष्यांनी मैदान गाजविले.  गेल्या तीस वर्षांमध्ये अनेक खेळाडूंना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांच्या करिअरला उभारी दिली. हॅण्डबॉलनंतर राज्याला सर्वाधिक छत्रपती विजेते दिलेत. खेळाडू तयार करण्यासोबतच नागपुरात राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. 

साधारणपणे शारीरिक शिक्षकांचा निवृत्तीनंतर घरी आराम करण्यावर भर असतो. मात्र, डॉ. पाटील त्याला अपवाद आहेत. निवृत्तीनंतरही त्यांनी खेळ आणि खेळाडूंशी नाळ तुटू दिली नाही. आजही ते युवा खेळाडूंना नियमितपणे मार्गदर्शन करीत आहेत. एनएसएसएममध्ये शिकलेले व तिथेच नोकरी करून निवृत्त झालेले डॉ. पाटील हे धंतोली येथील मैदानालाच आपली कर्मभूमी मानतात. मला ‘झीरोचा हिरो’ बनविण्यात नागपूर शा. शि. महाविद्यालय आणि डॉ. दीपक कविश्‍वर सरांचे फार मोठे योगदान असल्याचे ते मोठ्या मनाने कबूल करतात. मधल्या काळात आट्यापाट्याला किंचित मरगळ आली होती. या मातीतल्या खेळाचे अस्तित्वच धोक्‍यात आले होते. क्रीडामहर्षी ॲड. श्री. वा. धाबे यांनी प्रयत्न करून या खेळाला नागपूर व विदर्भात पुनरुज्जीवित केले. त्यांचा वारसा डॉ. कवीश्‍वर व डॉ. पाटील हे यशस्वीरीत्या पुढे चालवित आहेत. जिवंत असेपर्यंत आट्यापाट्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत राहील, असे पाटील यांनी सांगितले.

पुरस्काराबद्दल मनोगत व्यक्‍त करताना डॉ. पाटील म्हणाले, मी २०१४ मध्येच पुरस्कारासाठी  अर्ज केला होता. त्यानंतर गतवर्षी ऑनलाइन अर्जही दिला. पुरस्कार मिळताना राजकारण होते, अनेक अडथळे येतात, असे ऐकले होते. त्यामुळे मला फारशी अपेक्षा नव्हती. परंतु, प्रत्यक्षात पुरस्कार विजेत्यांच्या यादीत नाव आल्यानंतर मनापासून आनंद झाला. हा पुरस्कार माझ्या कार्याचा गौरव असून, यात माझ्या सहकाऱ्यांसोबतच पत्नी ममताचेही तितकेच योगदान आहे.

आट्यापाट्याला हवे शासकीय पाठबळ 
डॉ. अशोक पाटील यांनी या निमित्ताने आट्यापाट्याला शासकीय पाठबळ हवे असल्याचे बोलून दाखविले. ‘नॉन ऑलिम्पिक स्पोर्टस’ म्हणून बघितल्या जाणाऱ्या या खेळात उज्ज्वल करिअर व नोकरीची गॅरंटी नसल्यामुळे अन्य खेळांच्या तुलनेत युवा पिढीचा कल कमी आहे. त्यांना  पाँडीचेरी व मणिपूर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही आवश्‍यक प्रोत्साहन मिळाले तर आट्यापाट्या आणखी प्रगती करू शकतो, असे सांगून शालेय व महाविद्यालयीन स्तरावर आट्यापाट्याला स्थान मिळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

Web Title: marathi news nagpur news aatyapatya dr ashok patil