अयोध्येतील जागेवर राममंदिरच होईल - भय्याजी जोशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

नागपूर - अयोध्येतील जागेवर राममंदिरच होईल, दुसरे काहीही होणार नाही हे निश्‍चित आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढील कार्यवाही होईल; पण सर्वसहमतीने राममंदिर व्हावे, हीच संघाची भूमिका आहे; पण ही बाब सोपी नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

नागपूर - अयोध्येतील जागेवर राममंदिरच होईल, दुसरे काहीही होणार नाही हे निश्‍चित आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढील कार्यवाही होईल; पण सर्वसहमतीने राममंदिर व्हावे, हीच संघाची भूमिका आहे; पण ही बाब सोपी नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

भय्याजी जोशी यांनी श्री श्री रविशंकर यांच्या राममंदिर निर्माणासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांना समर्थन दर्शविले. राममंदिरासंदर्भात जे जे प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करून राममंदिर उभारणीसंदर्भात पुढे जाऊ. योग्य प्रक्रियेने हा विषय मार्गी लागावा. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेवर संपूर्ण विश्‍वास असून, त्यातून आलेल्या निर्णयानंतर मंदिरउभारणीची प्रक्रिया सुरू होईल. मंदिरनिर्माणाच्या कार्यात प्रत्येकाचा हातभार लागावा, हाच संघाचा मानस आहे. त्यासाठी प्रत्येकाशी चर्चा करावयाची असल्यास ती चर्चा करण्याची तयारी आहे. मात्र, या मुद्‌द्‌यावर सर्वसहमती होईलच, असे आज सांगता येत नाही. सध्या राममंदिराच्या निर्माणासाठी सकारात्मक वातावरण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

देशातील मोदी सरकार हे शेतकरी, कामगारविरोधी धोरण राबवित असल्याची टीका भारतीय मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण मंचाकडून करण्यात येत असून, विश्‍व हिंदू परिषदेकडूनही मोदींच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. या संदर्भातील प्रश्‍नाला उत्तर देताना भय्याजी जोशी म्हणाले की, प्रत्येक संघटनेला त्यांचे विचार घेऊन पुढे जाण्याचा अधिकार आहे. त्यावर काम करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भामसं, स्वदेशी जागरण मंचसारख्या संघटना आपले कार्य करीत आहेत. अनेकदा भाजप सरकारला अपेक्षित काम करता येणे शक्‍य होत नाही. संघटनांमध्ये मतभेद नसून केवळ मतभिन्नता असल्याचे स्पष्टीकरण भय्याजी जोशी यांनी दिले.

असहिष्णू तत्त्वांकडून पुतळ्याचे राजकारण
त्रिपुरातील पुतळा पाडण्यावरून संघ आणि भाजपवर टीका करण्यात आली. मात्र, केरळमध्ये होणाऱ्या हत्येबद्दल कुठेच बोलले जात नाही. एका वनवासी युवकाचा मृत्यू होतो. एका मुस्लिम युवकाला झोडपून मारल्याचे दाखविले जाते. यामागे काही विशिष्ट विचार कार्य करीत आहेत. त्रिपुरातील पुतळा पाडल्याचा कृतीचा संघाकडून निषेधच आहे. हा चिंतेचा विषय आहे. मात्र, असहिष्णू तत्त्व समाजात संभ्रम निर्माण करून पुतळ्यांच्या राजकारण करीत संघर्षाची परिस्थिती निर्माण करीत असल्याचे चित्र सध्या समाजात दिसत असल्याचे भय्याजी जोशी म्हणाले.

Web Title: marathi news nagpur news ayodhya ram mandir bhayyaji joshi