आरोपी प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

आरोपी प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर - अनैतिक संबंधातून विवाहित प्रेयसीचा कुदळीने हल्ला करून खून करणाऱ्या आरोपीने आपल्या गावी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला गंभीर अवस्थेत सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले असून, तेथे तो मृत्यूशी झुंज देत आहेत. 

सचिन पुरुषोत्तम पेंदुर (२६, दारोडा, पो. स्टे. वडनेर, जि. वर्धा) असे या आरोपीचे नाव आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीतेश्‍वरी (२०) हिचे तीन वर्षांपूर्वी चंद्रकुमार मडावीसोबत लग्न झाले होते. घरगुती वादातून पतीने गीतेश्‍वरीला तिच्या आईवडिलांकडे आणून सोडले होते. तेव्हापासून ती आपल्या आईवडिलांकडे राहून त्यांच्यासोबत हातमजुरीचे काम करायची. मागील ६ महिन्यांपासून ते प्रवीण भोंडे या कंत्राटदाराकडे काम करीत होते. जयताळा येथील दाते ले-आउट येथील बाबरे यांच्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी गीतेश्‍वरी आपल्या आईवडिलांसह राहत होती. याच बांधकामावर आरोपी सचिनचा भाऊ प्रेम पेंदुर हादेखील कामाला होता. दरम्यान, सचिनचे गीतेश्‍वरीसोबत सूत जुळले. डिसेंबर २०१७ मध्ये ती सचिनसोबत बल्लारशाला गेली होती. मात्र, सचिनला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. वडिलांना माहिती देऊन ती नागपूरला आली होती. सचिन-गीतेश्‍वरीचे संबंध संपविण्यासाठी तिच्या वडिलांनी मध्यस्थांमार्फत चंद्रकुमारसोबत संपर्क साधला आणि गीतेश्‍वरीला नेण्यासाठी त्याला नागपूरला बोलविले. १२ मार्च रोजी रात्री २.३० ते ३ वाजतादरम्यान सचिन बांधकामाच्या ठिकाणी आला. ज्या ठिकाणी गीतेश्‍वरी आणि चंद्रकुमार झोपले होते त्या ठिकाणी तो कुदळ घेऊन गेला. सचिनने कुदळीने दोघांच्याही डोक्‍यावर वार केले. गीतेश्‍वरी जागीच मृत पावली. गंभीर जखमी चंद्रकुमारवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.

सचिन होता फरार
गीतेश्‍वरीचा खून केल्यानंतर सचिन तेथून पळून गेला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके हिंगणघाट आणि बल्लारशा येथी गेली होती. मात्र, दोन्ही ठिकाणी तो सापडला नाही. सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास तो त्याच्या मूळ गावी दारोडा येथे गेला. दरम्यान, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ए. एम. जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसह सचिनच्या घरी गेले. सचिन घरी आला होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर तो कुठे गेला, हे माहीत नसल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. त्याच परिसरात एमआयडीसी पोलिस सचिनचा शोध घेत होते.

विष पिऊन ठाण्यात हजर
पोलिसांच्या भीतीपोटी सचिन रात्रभर आपल्या शेतातच झोपला. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्याने शेतातच विष प्राशन केले आणि सकाळी १०.३०च्या सुमारास वडनेर पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिस ठाण्यात येताच तो ओकाऱ्या करू लागल्या. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने नागपुरात प्रेयसीचा खून केल्याचे सांगितले. त्याची प्रकृती लक्षात घेता पोलिसांनी त्याला वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सचिनची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे सेवाग्रामच्या डॉक्‍टरांनी सांगितल्याचे वडनेरचे प्रभारी ठाणेदार मानकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com