माणसे जुळली हीच खरी संपत्ती - डॉ. बबनराव तायवाडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

नागपूर - आयुष्यात काम करताना अनेक माणसे भेटली. अनेकांनी माझ्यासाठी काम केले. कधी अपेक्षा बाळगल्या नाहीत. अशी जुळलेली माणसे हीच माझी खरी संपत्ती असल्याचे भावोद्गार धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी आज काढले. 

नागपूर - आयुष्यात काम करताना अनेक माणसे भेटली. अनेकांनी माझ्यासाठी काम केले. कधी अपेक्षा बाळगल्या नाहीत. अशी जुळलेली माणसे हीच माझी खरी संपत्ती असल्याचे भावोद्गार धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी आज काढले. 

महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सेवानिवृत्ती सोहळ्याला ते उत्तर देत होते. डॉ. तायवाडे म्हणाले, ज्या महाविद्यालयात विद्यार्थी होतो त्या महाविद्यालयाचा एक दिवस प्राचार्य होईल, असा विचारही मनात आला नव्हता. मात्र, यासाठी जे प्राध्यापक, प्राचार्य आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली व विश्‍वास टाकला त्यांचा विश्‍वास सार्थ करण्यासाठी आयुष्यभर झटलो. आजपर्यंत समाज आणि विद्यापीठात विश्‍वासू सहकाऱ्यांच्या भरोशावर काम करता आले. जे काम करायचे ठरविले ते अनपेक्षितपणे पूर्ण होत गेले. आयुष्यात दु:खालाही सुख मानून सकारात्मक विचार केला. त्यामुळे सेवानिवृत्त होत असल्याचे दु:ख नसून आयुष्यात काही करता आले याचा आनंद अधिक असल्याचे म्हणाले. 

कारकिर्दीच्या विविध टप्प्यांवर सहकार्याचा हात देणाऱ्या सर्वांचे त्यांनी यावेळी आभार मानले. भावी आयुष्यात राजकारणात येताना अनेक शत्रू निर्माण होणार असून त्यापासून सावध राहण्याचा सल्ला गिरीश गांधी यांनी त्यांना दिला. डॉ. गौरीशंकर पाराशर यांनी डॉ. तायवाडे व्यक्ती नसून समाजासाठी एक उपलब्धी असल्याचे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम आणि बाळ कुळकर्णी यांनीही विचार व्यक्‍त केले. तत्पूर्वी, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मित्र परिवारातर्फे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला सामाजिक कामांसाठी ५१ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहकारमंत्री आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष वसंतराव धोत्रे, अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, वनराईचे गिरीश गांधी, आमदार शशिकांत खेडेकर, नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्‍वस्त अनंतराव घारड, संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ. रामचंद्र शेळके, ॲड. गजानन फुंडकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, डॉ. केशव गावंडे, केशवराव मेतकर, उद्योजक प्रमोद मानमोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, ॲड. अशोकराव ठुसे, सचिव शेषराव खाडे, माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर, ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम, बाळ कुळकर्णी, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, एन. एच. खत्री, डॉ. तुकाराम शिवारे यांच्यासह डॉ. शरयू तायवाडे उपस्थित होत्या. प्रास्ताविक डॉ. प्रदीप घोरपडे यांनी केले, तर संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले.

डॉ. तायवाडे संचालक राहतील - वसंतराव धोत्रे
डॉ. बबनराव तायवाडे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्य म्हणून संपूर्ण आयुष्य महाविद्यालय आणि संस्थेला दिले. आज ते प्राचार्यपदावरून सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, ते या संस्थेतून कधीही निवृत्त होणार नाहीत असे सांगून ते संस्थेत संचालक म्हणून काम करतील, असे शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष वसंतराव धोत्रे यांनी सांगितले. धोत्रे यांनी डॉ. तायवाडे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव केला.

Web Title: marathi news nagpur news dr babanrao taywade talking