वॉर्ड निधीतून डस्टबिन खरेदी गाजणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

नागपूर - कचरा वर्गीकरणासाठी दोन डस्टबिन नागरिकांना पुरविण्याची महापालिकेची घोषणा हवेत विरली. मात्र, मोजक्‍या काही नागरिकांना नगरसेवकांच्या वॉर्ड विकास निधीतून डस्टबिन खरेदी करून देण्यात आले. आता महापालिकेला डस्टबिनचा विसर पडल्याने वॉर्ड विकास निधीचा बळी दिल्याची भावना नगरसेवकांत निर्माण झाली आहे. मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत डस्टबिन खरेदी गाजण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील साडेपाच लाख घरांमध्ये ओला व सुका कचऱ्यासाठी अनुक्रमे हिरवी व निळी अशा 11 लाख डस्टबिन देण्याची घोषणा महापालिकेने केली होती. यासाठी 14 कोटींचा खर्च अपेक्षित होता. महापालिकेला डस्टबिन खरेदी करण्यात अपयश आले. त्यामुळे नगरसेवकांनी वॉर्ड विकास निधी यासाठी देण्याचा पर्याय शोधण्यात आला. त्यामुळे काही डस्टबिन खरेदी केले. मात्र, दोन डस्टबिन महापालिकेसाठी अडचणीच्या ठरल्या. त्यामुळे ही योजनाच सध्या गुंडाळल्याचे चित्र आहे. 

या प्रकल्पासाठी नियोजन व व्यवस्थापनात महापालिका अपयशी ठरली. मात्र, दोन डस्टबिनसाठी नगरसेवकांच्या विकास निधीला कात्री लावण्यात आली. शहरात अनेक घरांत दोन डस्टबिन नसून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरणही होत नाही. आता ही योजना डब्यात गेल्याची चर्चा असून, ज्यांच्या विकास निधीतून डस्टबिन खरेदी केले, ते संताप व्यक्त करीत आहेत. 

या मुद्द्यावर मंगळवारी सभागृह गाजण्याचे संकेत ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी दिले आहे. याशिवाय थकबाकीवरून कंत्राटदारांनी काम बंद केले असून, प्रभागातील विकास ठप्प झाला आहे. त्यामुळे कंत्राटदारांचा थकीत रकमेवर विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी प्रश्‍न उपस्थित करून आक्रमकतेचे संकेत दिले. 

मैदानांवरूनही प्रशासन लक्ष्य 
शहरातील काही मैदाने पालक योजनेतून खासगी संघटना व संस्थांना दिली आहे. या मैदानाचा खासगी वापर सुरू झाला असून, पालक योजनेच्या नावावर मैदाने संस्था, संघटनांच्या घशात घालण्याचा प्रशासनाचा डाव सभागृहात उलटण्याची शक्‍यताही आहे. किशोर जिचकार यांनी याबाबत प्रश्‍न उपस्थित केला आहे. आभा पांडे यांनी शहरातील बाजारांच्या मुद्द्यावर प्रशासनाला घेरण्याचे संकेत दिले आहे.

Web Title: marathi news nagpur news dustbin garbage