मुंबईप्रमाणे नागपुरातही धावणार लोकल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नागपूर - मुंबईप्रमाणे नागपूर तसेच शेजारचे जिल्हे आणि तालुक्‍यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या साधनांचा वापर करून त्यावर लोकल ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव मेट्रो रेल्वेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्यानंतर गडकरी यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असे सांगून  सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगितले.

नागपूर - मुंबईप्रमाणे नागपूर तसेच शेजारचे जिल्हे आणि तालुक्‍यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या साधनांचा वापर करून त्यावर लोकल ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव मेट्रो रेल्वेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्यानंतर गडकरी यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असे सांगून  सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगितले.

काटोल-नागपूर, रामटेक-नागपूर, वर्धा-नागपूर, भंडारा-नागपूर हे सर्व तालुके व जिल्हे रेल्वेने जोडले आहेत. लांब पल्ल्याच्या मोठ्या गाड्या येथून धावतात. मात्र स्थानिक प्रवासी, व्यावसायिकांसाठी त्या फारशा उपयोगाच्या नाहीत. सर्वांचे मुख्यालय नागपूरला असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी येथून अप-डाउन करतात. काही पॅसेंजर सुरू आहेत, मात्र त्याच्या वेळा सोयीच्या नाहीत. याशिवाय बराच वेळ घेतात. प्रवासी मिळत नसल्याने रेल्वेला तोटाही सहन करावा लागतो. नागपूर-रामटेक पॅसेंजर २७ किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. या मार्गावर एकच पॅसेंजर आहे. मेट्रोच्या गाड्यांचा वेग १२० किलोमीटर प्रतितास आहे. ८० किलोमीटर लांब असलेले वर्धा स्थानक गाठण्यात पॅसेंजरला १०५ मिनिटे लागतात. मेट्रो ५८ मिनिटांत हे अंतर कापू शकते, अशी तुलनात्मक माहिती सादर करून यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, असे मेट्रोतर्फे सांगण्यात आले. नितीन गडकरी यांनी तोट्यातील पॅसेंजर बंद करण्याची सूचना केली. मेट्रोच्या गाड्या वेगाने धावणाऱ्या असल्याने मोठ्या प्रमाणात वेळ वाचेल. तो मेट्रोला वापरता येईल अशी सूचना केली. 

फक्त १०० कोटींचा खर्च 
तीन डब्यांच्या एका ट्रेनला २५ कोटी खर्च येतो. शंभर कोटी रुपये खर्च करून चार ट्रेन  घेतल्यास शेजारचे जिल्हे आणि तालुक्‍यातील प्रवाशांना वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. रेल्वेने परवानगी दिल्यास हा खर्च करण्याची तयारी असल्याचेही मेट्रो रेल्वेतर्फे सांगण्यात आले. 

रेल्वेच्या अडचणी
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोच्या प्रस्तावाचे स्वागत केले. मात्र, या मार्गांवर मोठ्या गाड्या सातत्याने धावतात. मालगाड्यांनाही मार्ग उपलब्ध करून द्यावा लागतो. थर्ड लाइन झाल्यावर हे शक्‍य होऊ शकेल, असे सांगितले. याशिवाय याकरिता रेल्वेमंत्री तसेच केंद्रातील अधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी लागेल, असेही सांगितले.

Web Title: marathi news nagpur news local metro nitin gadkari