मनमोहन वैद्य संघाचे सहसरकार्यवाह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. यात संघाचे प्रचारप्रमुख असलेले मनमोहन वैद्य यांना बढती देत सहसरकार्यवाहपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता संघात चारऐवजी सहा सहसरकार्यवाह राहणार आहेत.

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. यात संघाचे प्रचारप्रमुख असलेले मनमोहन वैद्य यांना बढती देत सहसरकार्यवाहपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता संघात चारऐवजी सहा सहसरकार्यवाह राहणार आहेत.

सरसंघचालकांच्या अलिकडील वक्तव्यामुळे वाद उद्भवल्यानंतर प्रचारप्रमुख म्हणून मनमोहन वैद्य यांनी "डॅमेज कंट्रोल'ची भूमिका समर्थपणे पेलली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक काल पार पडल्यानंतर रात्री नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ चार सहसरकार्यवाह राहत होते. यात दत्तात्रय होसबळे हे वरिष्ठ होते. आता चार सहसरकार्यवाहांची संख्या सहावर केली आहे. यात मनमोहन वैद्य व मुकुंद सी. आर. यांची निवड करण्यात आली आहे. भय्याजी जोशी यांच्या प्रकृतीबद्दल वारंवार बातम्या येत होत्या. त्यामुळे त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी तसेच त्यांना सहकार्य करण्यासाठी दोन नव्या सहसरकार्यवाहांची नियुक्ती केल्याचे, तर मनमोहन वैद्य यांना त्यांच्या कामाची पावती मिळाल्याचे बोलले जाते.

मनमोहन वैद्य हे मूळचे नागपूरचे असून, संघाचे माजी बौद्धिकप्रमुख मा. गो. वैद्य यांचे सुपुत्र आहेत. यापूर्वी मनमोहन वैद्य यांनी संघाचे प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे जेव्हा जेव्हा वाद झाले. त्या वेळी मनमोहन वैद्य यांनी तत्काळ व प्रभावी युक्तिवादाची आघाडी सांभाळली होती. यामुळे मनमोहन वैद्य यांचे संघातील महत्त्व अधोरेखित झाल्याचे बोलले जाते.

संघाची नवीन कार्यकारिणी
सरसंघचालक - डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह - भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह - दत्तात्रय होसबळे, मनमोहन वैद्य, मुकुंद सी. आर., डॉ. कृष्ण गोपाल, व्ही. भागय्या आणि सुरेश सोनी. बौद्धिकप्रमुख - स्वांत रंजन, शारीरिक प्रमुख - सुनील कुळकर्णी, सेवाप्रमुख - सुहास हिरेमठ, प्रचारप्रमुख - अरुण कुमार, संपर्कप्रमुख - अनिरुद्ध देशपांडे.

Web Title: marathi news nagpur news manmohan vaidya rss