प्रवासी ४१; तिकीट फक्त तिघांकडेच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

नागपूर - महापालिकेच्या आपली बसचे कंटक्‍टर प्रवाशांना तिकिटाचे वाटप करीत नसून पैसे खिशात घालीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मंगळवारी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी आकस्मिक पाहणी केली असता दोन बसमध्ये ४१ प्रवासी असताना फक्त तिघांकडेच तिकीट आढळले. यामुळे दोन्ही कंडक्‍टरांना ताबडतोब निलंबित करण्यात आले.

नागपूर - महापालिकेच्या आपली बसचे कंटक्‍टर प्रवाशांना तिकिटाचे वाटप करीत नसून पैसे खिशात घालीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मंगळवारी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी आकस्मिक पाहणी केली असता दोन बसमध्ये ४१ प्रवासी असताना फक्त तिघांकडेच तिकीट आढळले. यामुळे दोन्ही कंडक्‍टरांना ताबडतोब निलंबित करण्यात आले.

आपली बसमधील कंडक्‍टरांचा तिकीट मशीनचा स्मार्ट कार्ड घोटाळा यापूर्वीच उघडकीस आला आहे. सीताबर्डी पोलिस ठाण्यात तब्बल ३५ कंडक्‍टरांच्या विरोधात गुन्हासुद्धा दाखल झाला  आहे. यानंतरही मोठ्या प्रमाणात महापालिकेची लूट सुरू असल्याच्या तक्रारी सभापतींकडे येत होत्या. मंगळवारी सभापती बंटी कुकडे यांनी एकूण सहा बस तपासल्या. पारडी ते बर्डी धावणाऱ्या ६१४१ क्रमांकाच्या बसमध्ये एकूण २६ प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी एकाच प्रवाशाकडे तिकीट होते. इतरांनी आपण कंडक्‍टरला तिकीटाचे पैसे दिल्याचे सांगितले. मात्र, तिकीट दिले नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.  

यानंतर पारडी ते वायसीसीईपर्यंत धावणाऱ्या १५४० क्रमांकाच्या बसमध्ये कुकडे शिरले. या बसमध्ये १५ प्रवासी होते. त्यापैकी दोनच प्रवाशांकडे तिकीट होते.

महापालिकेच्या ३७० बसेस रोज धावतात. एकूण चार हजार सातशे फेऱ्या होतात. तिकीट तपासणीसाठी फक्त ३५ चेकर्स आहेत. प्रशासनातर्फे मात्र ४८ चेकर्स असल्याचा दावा केला  जात आहे. तीन दिवसांपूर्वी सभापती कुकडे यांनी परिवहन व्यवस्थापकांना सर्वांची ओखळ परेड करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, व्यवस्थापक जगताप यांनी अद्याप आदेशाचे पालन केले नाही. तपासणीच्या नावावर दिशाभूल केली जात असल्याने सभापतींनी परिवहन समितीच्या  सदस्यांनासुद्धा बस तपासणीचे अधिकार दिले असून, त्यांना ओळखपत्रसुद्धा दिले आहे.

कंडक्‍टरांचा एसएमएस अलर्ट
‘आपली बस’मध्ये कार्यरत असलेले वाहक व चालकांनी व्हॉटसॲप ग्रुप तयार केला आहे. तपासणी अथवा एखादी कारवाई होताच तत्काळ यावर एसएमएस करून इतरांना अलर्ट केले  जाते. दोन बसवर कारवाई झाल्यानंतर उर्वरित चार बसमध्ये सभापतींना सर्व काही सुरळीत आढळले. एकदोन प्रवाशांचा अपवाद वगळता इतरांकडे तिकीट होते.

Web Title: marathi news nagpur news nagpur mahapalika