९८ लाखांसह पाच दरोडेखोरांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

पेट्रोलपंप लुटीची होती योजना
आरोपी संतोष कदम हा टोळीचा म्होरक्‍या आहे. त्यांनी पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर पेट्रोल पंप लुटीची योजना आखली होती. त्यासाठी ते नियोजन करीत होते. शहराच्या सीमेलगत असलेल्या पेट्रोल पंपावर रात्रीच्या सुमारास छापा घालून कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लाखोंची रक्‍कम लुबाडण्याच्या तयारीत आरोपी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नागपूर - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी (ता. २४) अटक केली. आरोपींकडून ९८ लाख रुपयांच्या जुन्या नोटा आणि दोन काडतुसांसह पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.  

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांचे पथक शनिवारी सायंकाळी बजाजनगर परिसरात गस्त घालत होते. रहाटे कॉलनीतील उज्ज्वल प्लॉटमधील एका फ्लॅटमध्ये पाच जण संशयितपणे लपून बसल्याची माहिती गुप्तहेराने दिली. माहिती मिळताच ते पोलिस पथकासह रहाटे कॉलनीत आले आणि सापळा रचला. त्यांना कळायच्या आतच पोलिसांनी घेराव केला आणि अटक केली. त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली तसेच अंगझडती घेतली. दरम्यान, आरोपींकडे देशी बनावटीचे ऑटोमॅटिक पिस्तूल आणि दोन काडतुसे आढळली. बॅगमध्ये ९८ लाख रुपयांच्या एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा आढळून आल्या. संतोष जयवंतराव कदम (३६, यवतमाळ), राजेश देवीदास चांडक (२५, रा. मेडिकल चौक), दीप महानगू मार्शल (३५, वॉर्ड क्र. १, आनंदनगर (जि. चंद्रपूर), राधेलाल बेनीराम लिल्हारे (२७, खैरी, बालाघाट) आणि संतोष लक्ष्मीकांत कैकर्यमवार (३८, सीजीएम कॉम्प्लेक्‍स, वेकोलि, वणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेने बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाचही आरोपींना तीन दिवसांची (ता. २८) पोलिस कोठडी दिली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, प्रशांत चौगुले, संजय चव्हाण, उपनिरीक्षक श्रीनिवास मिश्रा, हवालदार अफसर खान पठाण, रमेश उमाठे, नरेश रेवतकर, नरेश सहारे, अमित पात्रे, आशीष ठाकरे, रवींद्र बारई, राहुल इंगोले, मंगेश मंडावी, आशीष देव्हारे, राजेंद्र सेंगर, अविनाश तायडे, नीलेश वाडेकर यांनी केली. 

नागरिकांना आला संशय
चार महिन्यांपूर्वी संतोष कदम याने रहाटे कॉलनी येथील उज्ज्वल फ्लॅट येथे नरेश अडसुळे (सोमलवाडा) यांच्याकडून भाड्याने फ्लॅट घेतला होता. आपल्या अन्य मित्रांसह तो या फ्लॅटमध्ये राहत होता. संतोष व त्याचे सहकारी काहीच कामधंदा न करता राहत असल्याने फ्लॅटमधील रहिवाशांना संशय आला. खबऱ्याने ही माहिती युनिट १ चे पीआय संदीप भोसले यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या फ्लॅटवर छापा घातला. या धाडीत पाचही जण पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून दोन जिवंत काडतुसांसह पिस्तूल आणि एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा असे ९८ लाख रुपये मिळाले. 

चलनीबाद नोटांचे गौडबंगाल
नागपुरातील राजेश चांडक हा नोटा बदलून देत असल्याची माहिती संतोष कदमला मिळाली. त्याचा यवतमाळला लॉन आहे. त्याने यवतमाळातील काही व्यापाऱ्यांकडून ९८ लाखांच्या नोटा गोळा केल्या. एखाद्या एक्‍स्चेंजरमार्फत या नोटा बदलवून देतो, असे लोकांना आमीष दाखवून त्यांच्याकडून नोटा घेतल्या. नोटा बदलविण्यासाठी त्याने राजेश चांडक याची मदत घेतली. त्यांनी बाजारात नोटा बदलविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे चार महिन्यांपासून त्या नोटा फ्लॅटवरच पडून होत्या, असे आरोपींनी सांगितले. संतोष कदमवर आतापर्यंत चेक बाउन्स आणि फसवणुकीचे गुन्हे असल्याची माहिती आहे.

फोटो ः क्राईम ब्रॅंच (फोटो पान आठवर रेडी)
कॅप्शन ः चलनीबाद ९८ लाखांच्या नोटांसह गुन्हे शाखेचे पीआय भोसले, एपीआय कुंभार आणि पथक.

Web Title: marathi news nagpur news robber arrested crime