‘मेट्रो’मुळे मनपा तिजोरीला ‘महा’फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नागपूर - महामेट्रोच्या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील मोक्‍याच्या जागा गमवाव्या लागल्याने महा-पालिकेच्या जाहिरात विभागाचे वार्षिक ६० लाखांचे उत्पन्न कायमचे बंद झाले. उत्पन्नवाढीसाठी महापालिका धावाधाव करीत असताना मनपाच्या तिजोरीला चांगलाच फटका  बसला आहे. परिणामी आता जाहिरात विभागाने दुकानांवरील फलकावर लक्ष केंद्रित केले असून, यातून जास्तीत जास्त उत्पन्नावर भर दिला जात आहे.

नागपूर - महामेट्रोच्या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील मोक्‍याच्या जागा गमवाव्या लागल्याने महा-पालिकेच्या जाहिरात विभागाचे वार्षिक ६० लाखांचे उत्पन्न कायमचे बंद झाले. उत्पन्नवाढीसाठी महापालिका धावाधाव करीत असताना मनपाच्या तिजोरीला चांगलाच फटका  बसला आहे. परिणामी आता जाहिरात विभागाने दुकानांवरील फलकावर लक्ष केंद्रित केले असून, यातून जास्तीत जास्त उत्पन्नावर भर दिला जात आहे.

नवनव्या उत्पन्नाच्या स्त्रोताच्या शोधात असलेल्या महापालिकेने पाच वर्षांपूर्वी जाहिरात धोरणाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. शहरातील रस्त्यावरील मोक्‍याच्या जागी जाहिरात लावण्यातून महापालिकेला उत्पन्नही सुरू झाले. वर्धा रोड, कामठी रोड, भंडारा रोडवरील  जागेवरील होर्डिंग्ससाठी महापालिका लाखो रुपये शुल्क घेत होती. यातून ६० लाख रुपये वार्षिक उत्पन्न महापालिकेला मिळत होते. मात्र, मेट्रो रेल्वे प्रकल्पात महापालिकेच्या या मोक्‍याच्या जागा गेल्या. या जागा कायमच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पात गेल्याने महापालिकेच्या तिजोरीला फटका बसला आहे. महापालिकेला या ६० लाखांवर कायमचे पाणी सोडावे लागणार आहे.

साडेचारशे दुकानदारांना देयके
महापालिकेच्या जाहिरात धोरणानुसार दुकानदारांनी दुकानासाठी २० बाय २० क्षेत्रफळाचे फलक लावण्याची मुभा आहे. मात्र, फलक यापेक्षा जास्त मोठा असल्यास शुल्क आकारण्यात येते. त्यानुसार महापालिकेने एजन्सीकडून दुकानांचे सर्वेक्षण केले होते. यापैकी ४५० दुकानदारांना फलकाचे शुल्क भरण्याबाबत देयके पाठविले आहे. यातून महापालिकेला यंदा ५० लाख रुपये मिळण्याची अपेक्षा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अवैध होर्डिंग्जविरोधात पोलिसांत ७६ तक्रारी
महापालिकेने जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात अवैध होर्डिंग्जविरोधात कारवाई केली. यात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था, राजकीय पक्षांचे नेत्यांचे अवैध होर्डिंग्ज, बॅनर रस्त्याच्या  बाजूला परवानगीशिवाय आढळले. १९५१ अवैध होर्डिंग्जविरोधात कारवाई करताना ७६ प्रकरणांत पोलिसांत तक्रार केली. यात ४६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एक लाख ९१ हजारांचा दंड वसूल
मागील वर्षी महापालिकेच्या दहाही झोनमध्ये १,९५१ अवैध होर्डिंग्ज व बॅनर आढळले. हे सर्व बॅनर व होर्डिंग्स काढले. यात शैक्षणिक संस्था, राजकीय पक्षांच्या बॅनर व होर्डिंग्जचा समावेश होता. ५९७ नागरिक या अवैध होर्डिंग्जसाठी जबाबदार असल्याचेही पुढे आले असून, त्यांच्याकडून एक लाख ९१ हजार ९७० रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, अवैध होर्डिंग्जची संख्या मोठी असून, यात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: marathi news nagpur vidarbha news municipal loss metro safe