murder
murder

राहुल आग्रेकर हत्याकांड : एकाला अटक

नागपूर : संपूर्ण शहरात चर्चेत असलेले लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी पंकज हारोडेला पोलिसांनी पश्‍चिम बंगालमधील हावडा शहरातून अटक केली आहे. मात्र, पोलिस हॉटेलमध्ये पोहचल्याची खबर मिळताच, दुसरा आरोपी दुर्गेश बोकडे हा फरार झाला. दुर्गेशच्या फरार होण्यात नागपूर पोलिसांचे अपयश असून त्याचा शोध नव्याने सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या अतिघाईमुळे आरोपी दुर्गेश हा फरार झाल्याचे म्हणले जाते. गेल्या 21 नोव्हेंबरला सकाळी नऊच्या सुमारास लॉटरी व्यवसायी राहुल आग्रेकर याचे पंकज हारोडे आणि दुर्गेश बोकडे या दोघांनी दारोकार चौकातून कारने अपहरण केले होते. राहुल यांना स्वस्त भावात शेती दाखविण्याचा बहाणा आरोपींनी केला होता. त्यानंतर बुटीबोरीत गेल्यानंतर राहुल यांचा मोठा भाऊ जयेश आग्रेकर याला फोनवरून एक कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास हत्या करण्याची धमकी आरोपींनी दिली होती. 

खंडणी न मिळाल्यामुळे आरोपींनी राहुलचा खून करून त्याला पेटीचुहा परिसरात पेट्रोल टाकून जाळले होते. 22 नोव्हेंबरला बुटीबोरी पोलिसांनी पेटीचुहा परीसरातून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला होता. या हत्याकांडात एकूण सहा आरोपी असल्याचा दावा राहुलचा भाऊ जयेशने केला होता. मात्र, हत्याकांडातील मुख्य आरोपी पंकज आणि दुर्गेश या दोघांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. दोघांनी बलेरोने नागपुरातून पळ काढला. मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगढ आणि पश्‍चिम बंगाल असा प्रवास आरोपींनी केला. दोन्ही आरोपी पश्‍चिम बंगालमध्ये असल्याची माहिती मिळाली. बुधवारी दुपारी नागपूर पोलिसांनी पश्‍चिम बंगालमधील हावडा शहरातील एका हॉटेलमध्ये लपून बसलेल्या दोन्ही आरोपींचा छडा लावला. हॉटेलच्या बाहेर सापळा रचला आणि झडप घातली. मात्र, कुठेतरी खबर लिक झाल्यामुळे मुख्य आरोपी दुर्गेश हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला तर पंकज हारोडेला बुधवारी अटक करण्यात आली. त्याला नागपुरात आणले असून या हत्याकांडातील अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. 

दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे यांनी हत्याकांडानंतर नागपुरातून पळ काढला. सर्वप्रथम शिवणी-मध्यप्रदेशात त्यांनी एक दिवस घालवला. नागपूर पोलिसांचे कनेक्‍शन पाहता दोन्ही आरोपींनी पश्‍चिम बंगाल गाठले. तेथे एका हॉटेलमध्ये दोन्ही आरोपी लपले होते. मात्र, गेल्या दहा दिवसांत आरोपींकडील सर्व पैसे संपले. त्यामुळे पैशाची गरज भासू लागल्याने पंकजने नागपुरात राहणाऱ्या जावायाला फोन केला. पैसे संपल्याचे सांगून पैशाची मागणी केली. तोच धागा पकडून सायबर क्राईमने आरोपींचा शोध लावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com