वांझ पशुंच्या संख्येत वाढ! 

अनुप ताले 
शुक्रवार, 16 मार्च 2018

कृत्रिम रेतनाद्वारे संकरीत पशुपैदास करून जास्त दुध देण्याची क्षमता असणाऱ्या गाई, म्हशी देशातच तयार करण्यात याव्या, या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाद्वारे पशुचिकित्सकांच्या मदतीने गावोगावी कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविला जातो.

अकोला - जिल्ह्यात दिवसेंदिवस पशुसंख्या रोडवत आहेच. परंतु, त्याहूनही चिंतेची बाब म्हणजे वांझ गायी-म्हशींची संख्येत वाढ होत आहे. यामागे योग्य संगोपनाचा अभाव, त्यामध्ये आहारात पोषक तत्वे, मुबलक खनिजांची कमतरता, गोठ्यातील अस्वच्छता, निर्जतूक पिण्याच्या पाण्याचा अभाव, जंतनाशक वापराबाबत उदासिनता इत्यादी कारणे असल्याची माहिती पशुतज्ज्ञांनी दिली. 

कृत्रिम रेतनाद्वारे संकरीत पशुपैदास करून जास्त दुध देण्याची क्षमता असणाऱ्या गाई, म्हशी देशातच तयार करण्यात याव्या, या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाद्वारे पशुचिकित्सकांच्या मदतीने गावोगावी कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविला जातो. परंतु, मोठ्या संख्येने गाई-म्हशींमध्ये वांझपणा आल्याने व अयोग्य संगोपनाने लक्षांकानुसार संकरीत वासरांची निर्मिती होऊ शकत नाही. जिल्हा पशुसंवर्धन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात 22 हजार कृत्रिम रेतन झाले असले, तरी सात हजार 859 संकरीत वासरेच जन्माला आली आहेत. सन 2012 च्या पंचवार्षीक पशुगणनेनुसार जिल्ह्यात तीन लाख अठरा हजार गाय, म्हैस व शेळी वर्गीय पशुसंख्या आहे. त्यानंतर पशुखाद्याचा तुटवडा, महागाई आणि यांत्रिकिकरणामुळे दिवसेंदिवस पशुसंख्या कमी झाल्याची शक्यता पशुसंवर्धन विभागाद्वारे वर्तविली जात आहे. पर्यायाने याचा परिणाम जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होत आहे. 

वंध्यत्व टाळण्यासाठी उपाययोजना 
* जनावरे माजावर असताना योग्यवेळी रेतन करणे 
* जी मादा जनावरांचा योग्यवेळी माज येत नाही त्यांची तपासणी करून, तज्ज्ञांकडून उपचार करावा. 
* सहा महिन्यातून एकदा जंतनाशक औषधी जनावरांना देण्यात यावी. 
* प्राण्यांचा ऊर्जा प्रदान करणाऱ्या आहारासोबतच जिवनसत्वे, खनिजे युक्त संतुलीत आहार नित्य देणे गरजेचे आहे. 
* चांगल्या पोषणासोबतच वासरांची योग्य देखभाल गरजेचे आहे. 
* वासरांचे 230 ते 250 किलो वजन होईल असे किंवा गर्भधारणेयोग्य शरीर बनेल याची काळजी घेणे. 
* गर्भधारेच्या काळात हिरवा चारा पुरेशा प्रमाणात दिल्यास नवजात वासरांमध्ये अंधत्व येत नाही नाळ सुरक्षित राहते. 
* रेतनासाठी उपयोगात येणाऱ्या बैलाच्या प्रजनन क्षमतेविषयी पूर्ण माहिती घ्यावी. 

अकोल्यातील जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. व्ही. बी. भोजने यांनी या संपूर्ण मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, 'पशुंमध्ये वांझपणा येण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये पशुसंगोपनाचा आणि आहारात पोषक घटकांचा अभाव महत्त्वाची कारणे आहेत. जिल्ह्यात 10 ते 15 टक्के पशुंमध्ये वांझपणा आढळतो. ही संकरीत पशुपैदास व दुग्ध व्यवसायासाठी चिंतेची बाब ठरत आहे.'  
 

Web Title: marathi news vidarbha akola animal problem