हजारो हेक्‍टरमधील पिके मातीमोल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

नागपूर : बोंडअळीवर आलेल्या गुलाबी रोगाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा रविवारी आभाळ कोसळले. गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतातील उरलेसुरले पीकसुद्धा नेस्तानाबूद झाले. अमरावती विभागात 72 हजार हेक्‍टर क्षेत्रातील पीक मातीमोल झाले. तीच स्थिती नागपूर विभागाची आहे. गहू, हरभरा, तूर आणि इतर रब्बी पिकांचे प्रचंड हानी झाली. कृषी विभागाने सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. मात्र, यानंतर मदत वेळीच पोहोचणार किंवा नाही, या शंकेतही शेतकरी आहेत. 

नागपूर : बोंडअळीवर आलेल्या गुलाबी रोगाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा रविवारी आभाळ कोसळले. गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतातील उरलेसुरले पीकसुद्धा नेस्तानाबूद झाले. अमरावती विभागात 72 हजार हेक्‍टर क्षेत्रातील पीक मातीमोल झाले. तीच स्थिती नागपूर विभागाची आहे. गहू, हरभरा, तूर आणि इतर रब्बी पिकांचे प्रचंड हानी झाली. कृषी विभागाने सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. मात्र, यानंतर मदत वेळीच पोहोचणार किंवा नाही, या शंकेतही शेतकरी आहेत. 

अमरावती जिल्ह्यात रविवारी (ता. 11) अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. यामुळे अमरावती विभागातील 804 गावे बाधित झाली असून तब्बल 72 हजार हेक्‍टर क्षेत्रातील फळबागा आणि शेतपिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्हा या आपत्तीतून रविवारी बचावला. मात्र, आज, सोमवारी जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांना गारपीट आणि पावसाचा तडाखा बसला. रविवारी झालेल्या गारपिटीच्या नुकसानाचे प्राथमिक सर्वेक्षण महसूल व कृषी विभागाने सुरू केले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील 247 गावांतील 32 हजार 700 हेक्‍टर, अमरावती-270 गावांतील 26,598 हेक्‍टर, अकोला-101 गावांतील 4 हजार 360 हेक्‍टर तसेच वाशीम जिल्ह्यातील 37 गावांतील 8 हजार 500 हेक्‍टर म्हणजेच 655 गावांतील 72 हजार 158 हेक्‍टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाले, असे विभागीय कृषी अधीक्षक विजय चवाळे यांनी सांगितले. 
महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार अमरावती जिल्ह्याच्या आठ तालुक्‍यांतील 384, अकोला जिल्ह्याच्या 7 तालुक्‍यांतील 31, बुलडाणाच्या 13 तालुक्‍यांतील 388 गावे आणि वाशीम जिल्ह्यातील 1 गाव, अशी एकूण 804 गावे बाधित झाली आहेत.

अमरावती जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगावसुर्जी, धारणी, चिखलदरा या गावांना अवेळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. जिल्ह्यात संत्रा, लिंबू, केळीचे तसेच कांदा, गहू, काढणीला आलेला हरभरा अशा पिकांचे नुकसान झाले. विभागात शेती व फळपिकांचे झालेले नुकसान संमिश्र स्वरूपाचे आहे. शासनातर्फे रविवारी (ता. 11) सर्वेक्षणाचे आदेश प्राप्त झालेत. उद्या, मंगळवारपर्यंत अवेळी पाऊस व गारपिटीचा अंदाज असल्याने ढगाळ वातावरणाची स्थिती ओसरताच प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होईल. 
आज, सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुक्‍यांमध्ये दुपारच्या सुमारास जोरदार गारपीट झाली. मात्र, वृत्त लिहिस्तोवर नुकसानाची माहिती मिळू शकली नाही. 

पूर्व विदर्भालाही फटका 
भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्‍यांतील रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लाखोळी, गहू, जवस, हरभरा या रब्बी पिकांचे नुकसान झाले. भाजीपाल्याला या पावसाचा फटका बसला. आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात गळाला. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रार्दुभाव होण्याची शक्‍यता आहे. पवनी तालुक्‍यात मांगली येथे वीज कोसळून एक गाय ठार झाली. 
गडचिरोली जिल्ह्यातील वादळी पावसामुळे कुरखेडा व कोरची तालुक्‍यात पिकांचे नुकसान झाले. यात मिरची, तूर, उन्हाळी धान तसेच मका पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यात मात्र मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र, कुठेही पावसाने हजेरी लावली नाही. झालेल्या तालुक्‍यात प्रशासनाने सवर्हेक्षण करून तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

जीवितहानी 
अमरावती जिल्ह्यात सात गायी व एका शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यात झाड पडून एका मुलीचा मृत्यू झाला; तर तिची बहीण वीज कोसळून जखमी झाली. चार जनावरे मृत्युमुखी पडलीत. अकोला जिल्ह्यात तीन व्यक्ती जखमी व एक जनावर मृत्युमुखी पडले. वाशीम जिल्ह्यात गारपिटीने एका महिलेचा मृत्यू झाला; तर एक जनावर मृत्युमुखी पडले.

Web Title: Marathi News Vidarbha rain