अभिनव प्रयोग : मारेगावच्या शेतकऱ्याने पिकवले रंगीत कापूस, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी

सूरज पाटील
Saturday, 2 January 2021

पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. मात्र, मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळला ओळख मिळाली आहे. याच जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने पांढऱ्या सोन्याला रंगीत करण्याची किमया करून दाखविली आहे.

यवतमाळ : पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. मात्र, मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळला ओळख मिळाली आहे. याच जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने पांढऱ्या सोन्याला रंगीत करण्याची किमया करून दाखविली आहे.

परवेज पठाण, असे प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. मारेगाव येथील ते रहिवासी आहेत. व्यवसायाने वकील असले; तरी शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा त्यांचा छंद आहे.

आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या रंगीत कापूस बियाण्यांची जपणूक करीत त्यांनी दरवर्षी काही झाडे लागवड केली. त्यामुळे बियाण्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यांच्या शेतीत यंदा पिवळा व कथ्थ्या रंगाचा कापूस झाला आहे. चाळीस ते पन्नास एकर क्षेत्रात लागवड करता येईल, इतके रंगीत कपाशीचे बियाणे झाले आहे.

अवश्य वाचा  :  शेतकऱ्यांना दिलासा! प्रशासनाकडून अखेर दुष्काळावर...

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी

यवतमाळ हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील शेतकरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र अपेक्षेप्रमाणे उत्पन्न होत नाही. भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत चालले आहेत. रंगीत कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तेथे या कापसाला दुप्पट भाव मिळतो. शेतकऱ्यांनी रंगीत कपाशीची लागवड केल्यास त्यांचे जीवनमान बदलू शकते.

कमी खर्चात जास्त लागवड

मारेगाव तालुक्‍यातील व्यवसायाने वकील असलेले योगशील शेतकरी परवेज पठाण यांनी शेतकऱ्यांना उन्नतीचा नवीन मार्ग दाखविला आहे. रंगीत कापसाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकावर बोंडअळीने आक्रमण केले नाही. खत व फवारणी कमी प्रमाणात करावी लागत असल्याने खर्चातही बचत होते. धागाही लांब आहे.

शेतकऱ्यांनी रंगीत कापसाकडे वळावे
शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा छंद आहे. गेल्या बारा वर्षांपासून माझा प्रयोग सुरू आहे. ४० ते ५० हेक्‍टर क्षेत्रात लागवड करता येईल, इतके बियाणे तयार झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रंगीत कापसाला चांगली मागणी आहे. भावदेखील चांगला मिळतो. शेतकरी रंगीत कापूस शेतीकडे वळल्यास निश्‍चित फायदा होईल.
- ॲड. परवेज पठाण, प्रयोगशील शेतकरी, मारेगाव.

(संपादन : दुलिराम रहांगडाले) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maregaon farmer grows colored cotton