बाजारपेठ हाउसफुल्ल 

सुधीर भारती
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

अमरावती : मंदीची झळ, पावसाची तुफान बॅटिंग या सर्व अडथळ्यांवर मात करीत अमरावतीकरांनी दिवाळीची तुफान खरेदी केली. शुक्रवार व शनिवार, असे दोन्ही दिवस बाजारपेठेत पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती, अशी स्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण बाजारपेठेत वाहतूक ठप्प झाली, तर दुकानांमधील गर्दी ओव्हरफ्लो झाली होती. 

अमरावती : मंदीची झळ, पावसाची तुफान बॅटिंग या सर्व अडथळ्यांवर मात करीत अमरावतीकरांनी दिवाळीची तुफान खरेदी केली. शुक्रवार व शनिवार, असे दोन्ही दिवस बाजारपेठेत पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती, अशी स्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण बाजारपेठेत वाहतूक ठप्प झाली, तर दुकानांमधील गर्दी ओव्हरफ्लो झाली होती. 

यंदा आर्थिक मंदी, त्यातच पावसाची सतत रिपरिप यामुळे व्यवसायावर परिणाम होणार, अशी अटकळ व्यावसायिकांमध्ये सुरुवातीला व्यक्त केली जात होती. पावसामुळे व्यवसायावरसुद्धा परिणाम झाला. मात्र दिवाळीच्या खरेदीवर कुठेही मंदी दिसून आली नाही. दिवाळीच्या ऐन हंगामात पावसाची तमा न बाळगता अमरावतीकरांनी बिनधास्त खरेदी केली. शहरातील जवाहरगेट, जयस्तंभ, चित्रा चौक, सराफा बाजार गर्दीने नुसता फुलून गेला होता. चारचाकी तसेच दुचाकी पार्क करण्यासाठी उपलब्ध पार्किंगसुद्धा हाउसफुल्ल झाल्याने वाहने कुठे ठेवावीत, असा प्रश्‍न नागरिकांना पडला होता. अनेकांनी त्यासाठी नेहरू मैदान तसेच मिळेल त्याठिकाणी आपली वाहने पार्क केली. एकूणच अमरावतीकरांचा यंदाचा दिवाळी उत्साह वाखाणण्यासारखा होता.

कापड मार्केटात खरेदीची धूम
शहरातील तखतमल इस्टेट, जयस्तंभ चौकसह बिझीलॅण्ड, सिटीलॅण्ड याठिकाणी कापड खरेदीसाठी नागरिकांनी धूम केली होती. विशेषतः तरुण, तरुणी तसेच बच्चे कंपनीमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. दिवाळीच्या खरेदीवर विविध ऑफर्स नागरिकांना भुरळ पाडणाऱ्या होत्या. 
 
सराफा बाजार गजबजला
धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी शहरातील सराफा बाजार तसेच आभूषणांच्या शोरूम्समधील ग्राहकांची गर्दी कायम होती. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येलासुद्धा सोने तसेच दागिने खरेदीसाठी नागरिकांनी सराफा बाजारात गर्दी केली होती. 

झेंडूची मागणी वाढली
दिवाळीच्या सणाला झेंडूच्या फुलांचे महत्त्व मोठे आहे. शनिवारी दुपारपर्यंत 50 रुपये किलोप्रमाणे विकले गेलेल्या झेंडूच्या फुलांची आवक वाढल्यानंतर दुपारनंतर 30 रुपयांना मिळत होती. मोठ्या प्रमाणावर झेंडू बाजारात दाखल झाल्याने ठिकठिकाणी फुलांची दुकाने सजली होती. 
 
रस्त्यावर गर्दी, मात्र अपेक्षेप्रमाणे व्यवसाय नाही
रस्त्यावर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी जरी दिसत असली तरी प्रत्यक्षात अनेक वस्तुंची खरेदी नागरिकांकडून ऑनलाइन केली जात असल्याने लहान व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. मोबाईल तसेच अन्य साहित्य ऑनलाइन मागवण्यात आले आहे. त्याचा फटका लहान व्यापाऱ्यांना बसला आहे, अशी प्रतिक्रिया महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी दिली. 

मॉल हाउसफुल्ल, ऑनलाइन तेजीत 
शहरातील मॉल गर्दीने फुलून गेले होते. मॉलमध्ये पाय ठेवायलासुद्धा जागा शिल्लक राहिली नव्हती. याशिवाय ऑनलाइन खरेदीला जणू उधाण आले. तरुणाईने विविध ऑफर्सचा मनसोक्त आनंद लुटत खरेदी केली. एकट्या अमरावती शहरत लाखोंच्या घरात ऑनलाइन खरेदी करण्यात आल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market House Flourishing