नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नागपूर :  लग्नात ठरलेला हुंडा माहेरून आणण्यासाठी तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नंदनवन परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासू-नणंदेविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पूजा निखिल पवार (27) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल पवार (32), अलका पवार (55) आणि हर्षा गिरमकर (35) सर्व रा. दर्शन कॉलनी, नंदनवन अशी आरोपींची नावे आहेत. पूजा (27) मूळची मध्य प्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील एका खेडेगावची आहे. तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असून, आई व दोन भावांसह राहात होती. दरम्यान, आरोपी निखिलचे स्थळ तिला आले. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने 12 डिसेंबर 2018 ला दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर दोन महिने आनंदात गेले. यादरम्यान तिला गर्भधारणा झाली. तेव्हापासून आरोपी निखिल तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तसेच सासू अलका आणि नणंद हर्षा तिला लग्नाच्या वेळी कबूल केलेला हुंडा पूर्णपणे न दिल्याने छळ करायच्या. तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायच्या. सततच्या त्रासाला कंटाळून पूजाने नऊ जुलैला सकाळी आपल्या खोलीत गळफास घेतला. सकाळपासून पत्नी खाली स्वयंपाकघराकडे न आल्याने पतीने पहिल्या माळ्यावर जाऊन पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर तपासात पती, सासू व नणंदेच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. नंदनवनच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक स्नेहा जायभाये यांनी हुंड्यासाठी छळ करणे व आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींना अद्याप अटक केलेली नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married Suicide news