esakal | नवविवाहितेच्या आत्महत्येमुळे राडा मृतदेहाचा ताबा घेण्यावरून वाद
sakal

बोलून बातमी शोधा

 suicide

नवविवाहितेच्या आत्महत्येमुळे राडा मृतदेहाचा ताबा घेण्यावरून वाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील एका नवविवाहितेने विषार प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेहाचा ताबा घेण्यावरून इर्विनच्या शवागारासमोर रविवारी (ता. १२) सायंकाळपर्यंत वाद सुरू होता.

ममता गणेश पवार (रा. खराळा, चांदूरबाजार), असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेने कौटुंबिक कारणावरून शनिवारी (ता. ११) विष प्राशन केले. त्यामुळे पतीने त्यांना उपचारासाठी अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात दाखल केले. येथे रविवारी उपचारादरम्यान ममता पवार यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर सासरच्यांनी घटनेची माहिती महिलेच्या माहेरच्यांना दिली.

हेही वाचा: आमदार साहेब, मुली पटत नाहीत थोडं बघा ना : पत्र व्हायरल

ही माहिती उशिरा दिल्यावरून आधी त्यांच्यात इर्विन रुग्णालयात शाब्दिक वाद झाला. त्यामुळे सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्यू होऊनही सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया रखडली होती. सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत शवविच्छेदन करणार नसल्याची भूमिका माहेरच्यांनी घेतली. त्यामुळे तक्रार दाखल करण्यासाठी काही मंडळी दुपारी चांदूरबाजार ठाण्यात पोहोचले. चांदूरबाजार पोलिसांनी आधी शवविच्छेदन केल्यानंतर कारवाई करण्यास सांगितले. त्यामुळे पुन्हा सायंकाळपर्यंत जवळपास दीडशे ते दोनशेच्या आसपास नातेवाइकांचा जमाव शवागारासमोर जमला.

सुरक्षेसाठी शहर कोतवाली पोलिसांना पाचारण करण्यात आले. शवविच्छेदन होण्यापूर्वीच मृतदेह ताब्यात देण्याचा आग्रह मृत महिलेच्या माहेरच्यांनी धरला. तर सासरच्यांनी अंत्यसंस्कार घरीच करण्यावर मत व्यक्त केल्यानंतर दोन्ही गटांत वादविवाद सुरू होते. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर शवविच्छेदन सुरू केले. परंतु, मृतदेह कुणाच्या ताब्यात द्यायचा, यावर वृत्त लिहीस्तोवर तोडगा निघू शकला नाही.

loading image
go to top