"स्मार्ट सिटी'त निवड निवडणुकीपुरती ठरू नये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

नागपूर - महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून "स्मार्ट सिटी'त नागपूरची निवड केली असेल तर ही योजना पूर्णतः अपयशी ठरण्याची शक्‍यता आहे. स्मार्ट सिटीत नागपूरची निवड ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित ठरू नये, असा सूर आज मान्यवरांनी लावला. त्याचवेळी कुठल्याही सर्जनशीलतेसाठी सकारात्मकता आवश्‍यक असून, स्मार्ट सिटीबाबतही हाच दृष्टिकोन बाळगण्याची गरजही व्यक्त करतानाच चर्चासत्रात राजकीय टोलेबाजीही रंगली.

वनराई फाउंडेशनतर्फे शंकरनगर चौकातील बाबूराव धनवटे सभागृहात "स्मार्ट सिटी-आव्हाने' यावर चर्चासत्र पार पडले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सतीश साल्पेकर होते तर आर्किटेक्‍ट अशोक मोखा, मनपातील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, नगरसेविका प्रगती पाटील, मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम, जनमंचचे ऍड. अनिल किलोर यांनी "स्मार्ट सिटी'वरील आव्हानावर मत व्यक्त केले. मनपातील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी निवडणुकीच्या वेळेला स्मार्ट सिटी योजनेत नागपूरच्या समावेशाची अपेक्षा होती अन्‌ झालेही तसेच. पण, स्मार्ट सिटीची घोषणा ही निवडणुकीपूर्वीचा "जुमला' किंवा त्यानंतर "गले की हड्डी' बनू नये, असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. केंद्र व राज्य सरकारने महापालिकेला यापूर्वीही सुविधांसाठी पैसा दिला. केंद्र व राज्याने पैसा दिला; परंतु मनपातील सत्ताधारी व अधिकाऱ्यांचीच वृत्ती सुधारली नाही तर स्मार्ट सिटी होणार नाही, असेही ते म्हणाले. स्मार्ट सिटीत अनधिकृत वस्त्या अधिकृत केल्या जाईल, तेथे विकास होईल, या विकासाचे शुल्क या अनधिकृत वस्त्यांत राहणाऱ्यांना झेपेल का? याचा विचार होण्याची गरज हेमंत गडकरी यांनी व्यक्त केली. स्मार्ट सिटीसाठी दूरदृष्टीची गरज असल्याचे नमूद करीत त्यांनी 12 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला उड्डाणपूल आज तोडला जात असून ही कसली दूरदृष्टी असा टोला हाणला. पहिल्या टप्प्यात निकषाच्या आधारावर नागपूर स्मार्ट सिटीत अपयशी ठरले. आता निकषाच्या आधारावर ते स्मार्ट सिटीत बसले, ते बसवले असे मी म्हणणार नाही, असे सांगून ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम यांनीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. संचालन राष्ट्रवादीचे नेते अजय पाटील यांनी, तर प्रास्ताविक डॉ. पिनाक दंदे यांनी केले.

Web Title: mart City's cost at the time of the election