मतीनच्या प्रश्नचिन्ह शाळेसमोर "प्रश्नचिन्ह'

मंगरूळ चव्हाळा ः तुराट्या व टिनाची प्रश्‍नचिन्ह शाळा व त्यासमोर जेवण करताना विद्यार्थी.
मंगरूळ चव्हाळा ः तुराट्या व टिनाची प्रश्‍नचिन्ह शाळा व त्यासमोर जेवण करताना विद्यार्थी.

अमरावती ः फासे पारधी समाजाची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी, यासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या मतीन भोसले यांचा संघर्षाशी सामना अद्यापही संपलेला नाही. समृद्धी महामार्गात त्यांची आश्रमशाळा जात असल्याने प्रश्‍नचिन्ह शाळेच्या समोर आता पुनर्वसनाचे नवे प्रश्‍नचिन्ह लागले आहे.
समृद्धी महामार्गाच्या कामात फासेपारधी समाजाच्या मुलांची ही शाळा जाऊ नये, यासाठी मतीन भोसले यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. आंदोलने झाली, निवेदने देण्यात आली; मात्र शासनाने अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. नवी आश्रमशाळा बांधण्यासाठी पर्यायी जागा देण्याचे आश्‍वासनसुद्धा मतीन भोसले यांना सरकारच्या वतीने देण्यात आले. मात्र, हे आश्‍वासनदेखील अद्याप पाळण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे प्रचंड मेहनतीने उभारलेली ही शाळा जाणार, या कल्पनेनेच येथील मुलांच्याच काय तर मतीनचा आजवरचा संघर्ष पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात.
अमरावती जिल्ह्यातील नांदगावखंडेश्‍वर तालुक्‍यातील मंगरूळ चव्हाळा येथे मतीनने प्रश्नचिन्ह निवासी आश्रमशाळा उभारली. फासे पारधी समाजाच्या 422 हून अधिक निरागस मुलांचे संगोपन तो सध्या करीत आहे. अन्य शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्या तरी मतीनची ही शाळा 12 महिने सुरूच असते. सध्या समृद्धी महामार्गाचा अडथळा तसेच या महामार्गाच्या कामामुळे मुलांना पाणी पुरविणाऱ्या बोअरवेल तसेच विहिरीचे पाणी दूषित झाल्याने सर्वच मुलांना त्यांच्या नातेवाइकांकडे पाठविले आहे. आश्रमशाळेत सध्या केवळ 25 मुले आहेत, असे मतीन भोसले यांनी सांगितले.
मतीन भोसले हा नोकरीवर होता, त्यातून त्याचा प्रपंच चालला असता; पण फासेपारधी समाजाच्या मुलांना शिक्षण मिळावे ही त्याची तळमळ त्याला गावाकडे घेऊन आली. त्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या मूळ गावी 2013 मध्ये त्याने ही शाळा सुरू केली. या शाळेची जागा आता समृद्धी महामार्गात येत आहे. ज्या झोपड्यांमधून प्रश्नचिन्ह आश्रमशाळेला सुरुवात झाली त्या झोपड्या, विहीर, बोअरवेल नव्याने बांधलेल्या पाच खोल्या, शाळेची पक्की खोली, वाचनालय महामार्गात लुप्त होणार आहे. त्यामुळे हे सर्व वाचविण्याची मतीनची धडपड सुरू आहे.

सरकारने जागा देण्याची कबुली दिली; पण अद्याप जागा मिळालेली नाही. परत सर्वकाही उभारण्याचे आव्हान आहे. सध्या आचारसंहिता असल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे सध्या "वेट ऍण्ड वॉच', अशी भूमिका घेतली आहे.
-मतीन भोसले, प्रश्‍नचिन्ह आश्रमशाळा, मंगरूळ चव्हाळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com