शिवसेना देणार विदर्भातील खासदाराला मंत्रीपदाची संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

यवतमाळ : लोकसभा निवडणूक सलग पाचव्यांदा जिंकणाऱ्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. आज सायंकाळीच किंवा फारच फार उद्या सकाळपर्यंत याबाबत निर्णय होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी "सकाळला सांगितले.

यवतमाळ : लोकसभा निवडणूक सलग पाचव्यांदा जिंकणाऱ्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. आज सायंकाळीच किंवा फारच फार उद्या सकाळपर्यंत याबाबत निर्णय होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी "सकाळला सांगितले. सलग पाच वेळा निवडून येणाऱ्या विदर्भातील त्या एकमेव महीला खासदार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभूत केले आहे.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसुळ, शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभवाचे तोंड बघावे लागले. त्यामुळे सध्या गवळी वरीष्ठ खासदार आहेत. गेल्यावेळी 92 हजार मतांच्या आघाडीने निवडून येणाऱ्या भावना गवळींनी यावेळी तब्बल 1 लाख 17 हजार मतांची आघाडी घेतली. विशेष म्हणजे पाचही निवडणुकांमध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गजनेत्यांना त्यांनी पराभूत केले आहे.

वाशीम लोकसभा मतदार संघातून 1999 मध्ये पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी अनंतराव देशमुख यांना 39,595 मतांनी पराभूत केले होते. त्यांनी 2,44,820 मते मिळविली होती, तर देशमुखांना 2,05,225 मते मिळाली होती. त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बलाढ्य नेते मनोहर नाईक यांना 60,898 मतांनी हरविले होते. गवळी यांना 3,58,682 तर तर नाईक यांना 2,97,484 मते मिळाली होती. त्यानंतर 2009 मध्ये यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांना त्यांनी 57,011 मतांनी मात दिली होती. गवळींना 3,84,443 तर मोघेंना 3,27,432 मते मिळाली होती.

गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे हरीभाऊ राठोड यांना 93,816 मतांनी पराभूत केले होते. गवळींना 4,77,905 आणि राठोड यांना 3,84,089 मते मिळाली होती. यावेळीसुद्धा त्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना 1,18,749 मतांनी पराभूत केले. गवळींना 5,42,908, तर ठाकरेंना 4,24,159 मते मिळाली. 2009 चा अपवाद वगळता भावना गवळींच्या मताधिक्‍याचा आलेख चढताच राहिला आहे.

सतत निवडून येत यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात सेनेचा झेंडा फडकवत ठेवल्याबद्दल यावेळी त्यांना मंत्रीपद नक्की मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. पक्षप्रमुखांनीदेखील तसे संकेत दिल्याचे काहींचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: May be Shivsena gives Ministry to Bhavna Gavli