गोकुळपेठ बाजारातील दुर्गंधीने महापौर त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जुलै 2019

नागपूर : गोकुळपेठ बाजार परिसरातील दुकानांसमोर टाकलेल्या कचऱ्यातून निघणाऱ्या दुर्गंधीवरून महापौर नंदा जिचकार दुकानदारांसह प्रशासनावर चांगल्याच संतापल्या. दुकानासमोर अथवा बाजारात कचरा निर्माण करणाऱ्या दुकानदारांना तत्काळ नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यानिमित्त दुकानदारांवर धरमपेठ झोन अधिकाऱ्यांचे कुठलेही नियंत्रण नसल्याचेही उघड झाले.

महापौर नंदा जिचकार यांनी शनिवारी धरमपेठ झोनअंतर्गत गोकुळपेठ बाजाराचा आकस्मिक दौरा केला. यावेळी त्यांना बाजारात कचरा मोठ्या प्रमाणावर आढळला. दुर्गंधी येईपर्यंत कचरा तेथेच पडल्याचे बघताच त्यांनी नाराजी व्यक्त केली व बाजार स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेविका रूपा रॉय, नगरसेवक संजय बंगाले, सुनील हिरणवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरिता कामदार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, झोनल अधिकारी डी. पी. टेंभेकर उपस्थित होते.
महापौर दुपारी साडेचारच्या सुमारास गोकुळपेठ बाजारात पोहोचल्या. अनेक दुकानांसमोर त्यांना कचरा पडलेला आढळला. दुकानदारांना त्यांनी तंबी देत यापुढे दुकानासमोर कचरा आढल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. प्रत्येक दुकानदाराने दुकानासमोर कचरापेटी ठेवावी. ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाजारातील मटण मार्केट, मच्छी मार्केटचीही त्यांनी पाहणी केली. तेथील दुर्गंधीमुळेही अधिकाऱ्यांना बजावले. बाजारातील काही जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आढळला. तो कचरा तातडीने उचलण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayors nanda jichakar news