छत गळते, भिंतींनाही ओल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नागपूर : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधालयासह एक्‍स रे विभाग परिसरात पाणीच पाणी साचले आहे. वॉर्ड क्रमांक 18 मध्ये छताला गळती लागल्याने कुलरचे टप आणि प्लॅस्टिकचे ड्रम ठेवले आहेत. याशिवाय कान-नाक-घसा विभागाजवळच्या परिसरातही मोठे टप ठेवले आहेत. याचा फटका रुग्णांना बसतोय.

पावसाचा फटका रुग्णांना बसत असल्याने रुग्णांच्या खाटा हलवण्यात आल्या. अतिदक्षता वॉर्डालगत पाणी होते. औषधालयात पावसाचे पाणी शिरले. आपत्कालीन विभागाच्या बाजूला असलेल्या बोळीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. वर्षानुवर्षे पावसाचे पाणी औषधालयात शिरते. यामुळे आधीच कर्मचारी औषधं निकामी होऊ नये यासाठी खबरदारी घेतात. नऊ कोटींचे औषधालय उभारल्यानंतरही याचा उपयोग अद्याप करण्यात येत नसल्याची चर्चा मेडिकल वर्तुळात आहे.
पाऊस आला की, पावसाचे पाणी मेडिकलच्या विविध भागांत शिरते. परंतु, वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला उपाययोजना करण्यासंदर्भात खडसावत नसल्यामुळे असे प्रकार दरवर्षी दिसून येतात.
वॉर्डांच्या भिंती पाझरतात
औषधालयाच्या भिंतीतून पावसाचे पाणी पाझरते. तसेच अनेक वॉर्डांच्या भिंतीतून पाणी झिरपते. याकडेही मेडिकल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. विजेच्या तारा याच भिंतीतून टाकल्या आहेत. यामुळे विजेचा धक्का लागण्याचा मोठा धोका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. मेडिकल परिसरात तीन अतिदक्षता विभागापासून तर इतरही बांधकामाचे पेव फुटले आहे. यामुळे जिकडे बघावे तिकडे कचरा, मातीचे ढिगारे दिसतात. त्यामुळे गटारलाइन चोक झाल्या असून, ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: medical hospital news