महिला असूनही असतात त्या रक्तदानासाठी सदैव तत्पर अन् वाचवितात लोकांचे प्राण  

आर.व्ही. मेश्राम 
Sunday, 14 June 2020

समाजकार्य करण्याचे घरातूनच त्यांना मिळालेले बाळकडू. त्यामुळे लग्नानंतरही त्यांनी समाजकार्य सुरूच ठेवले. समाजकार्य करीत असतानाच रक्तदान करण्याचे महान कार्यही त्यांनी सुरू ठेवले.

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : रक्तदानातून अनेकांना जीवनदान मिळते. त्यामुळेच रक्तदान म्हणजे जीवनदान असे म्हटले जाते. येथील सामाजिक कार्यकर्त्या मेहजबीन राजानी यांनी आतापर्यंत 55 वेळा रक्तदान केले आहे. 

अनेकदा गंभीर अपघात होतात. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला रक्ताची गरज भासते. पैसा असूनही वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास अनेकांना प्राणाला मुकावे लागते. रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नसल्याने गरजेच्या वेळेस रक्त मिळेल हे सांगता येत नाही. अशा गरजूंना आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात तब्बल 55 वेळा रक्तदान करणाऱ्या मेहजबीन राजानी या सडक अर्जुनी येथे वास्तव्यास आहेत. 

घरातूनच मिळाले बाळकडू

समाजकार्य करण्याचे घरातूनच त्यांना मिळालेले बाळकडू. त्यामुळे लग्नानंतरही त्यांनी समाजकार्य सुरूच ठेवले. समाजकार्य करीत असतानाच रक्तदान करण्याचे महान कार्यही त्यांनी सुरू ठेवले. युवा पिढीने रक्तदान करून अनेकांना जीवन देण्याचे कार्य करावे म्हणून त्यांनी विविध ठिकाणी रक्त तपासणी तसेच रक्तदान शिबिरांचे आजवर आयोजन केले आहे. एवढेच नव्हे तर शंभरावर क्षय रुग्णांना त्यांनी सहकार्याच्या भावनेतून मदत केली आहे. अनेक 

अवश्य वाचा- धंद्यावर बसवण्याची धमकी देणारी `लुटेरी दुल्हन` प्रिती दास पोलिसांच्या जाळ्यात

रुग्णांना बंगलोर, नागपूरसह विविध ठिकाणच्या शिबिरात त्यांनी नेले. कुटुंब कल्याण योजना, नेत्रदान याविषयी महिलांना प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल शासनाद्वारे "समाजभूषण सावित्रीबाई फुले' आणि विविध पुरस्कार मिळाले आहेत. 

"रक्त वाचवी प्राण, हेच आपले दान' याप्रमाणे प्रत्येक युवक, महिला, युवतींनी या कार्यात सहभागी झाले पाहिजे. सध्या देशात कोरोना या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. अशा वेळी स्वेच्छेने रक्तदान केले पाहिजे. 
- मेहजबीन राजानी, सडक अर्जुनी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mehjabeen Rajani has donated blood 55 times so far