मेळघाटच्या मुलांची गुजरातमध्ये पिळवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

धारणी (जि. अमरावती) - कमी श्रमात जास्त मजुरी देण्याचे आमिष दाखवून आदिवासीबहुल धारणी तालुक्‍यातील मुलांना गुजरातमध्ये नेण्यात आल्याचे व तेथे त्यांची पिळवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मेळाघाटात काम करणाऱ्या काही समाजसेवकांच्या पुढाकारामुळे या मुलांची सुटका झाली. 

धारणी (जि. अमरावती) - कमी श्रमात जास्त मजुरी देण्याचे आमिष दाखवून आदिवासीबहुल धारणी तालुक्‍यातील मुलांना गुजरातमध्ये नेण्यात आल्याचे व तेथे त्यांची पिळवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मेळाघाटात काम करणाऱ्या काही समाजसेवकांच्या पुढाकारामुळे या मुलांची सुटका झाली. 

मेळघाटातील हरिसाल व दुनी या गावांतील १५ अल्पवयीन मुलांना जास्त मजुरीचे आमिष दाखवून गुजरातमधील अहमदाबादच्या काही व्यावसायिकांनी आपल्या कारखान्यात कामासाठी बोलाविले होते. तेथे गेल्यानंतर त्यांनी एक महिना काम केले. ते काम अतिशय कष्टाचे होते व मजुरी मात्र अल्प दिली जात होती. त्यामुळे या मुलांनी कारखानाच्या मालकांना घरी परत जाण्याची परवानगी मागितली. या मालकांनी या मुलांना घरी जाण्याची परवानगी व कामांचे पैसे देण्यास नकार दिला. ही बाब या मुलांनी आपल्या पालकांना कळविली.

विशेष म्हणजे या मुलांना आपण कोठे काम करीत आहोत, त्या कंपनीची नावे व पत्तेदेखील माहीत नव्हते. घाबरलेल्या पालकांनी हरिसाल येथील डॉ. ऋषिकेश खिल्लारे यांना ही हकिगत सांगितली. डॉ. खिल्लारे यांनी समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे यांना सविस्तर माहिती दिली. या दोघांनी नाशिक येथील समाजसेवक प्रसाद समर्थ, तसेच अहमदाबादमधील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक आशुतोष जानी यांच्याशी संपर्क साधला. ही मुले अहमदाबादमधील ज्या कारखान्यात काम करीत होती ते कारखाने शोधून काढण्यात आले. त्यानंतर डॉ. खिल्लारे यांनी सर्व हकिगत पोलिस स्टेशनला येऊन सांगितली. याबाबत गुजरात पोलिसांशी संपर्क साधून या सर्व मुलांची तेथून सुटका करण्यात आली. 

अहमदाबाद येथील आशुतोष जानी यांनी या सर्व मुलांना मंगळवारी (ता.२५) सायंकाळी ट्रॅव्हल्सद्वारे खंडवा येथे रवाना केले. आज सकाळी ही सर्व मुले धारणी पोलिस ठाण्यात पोचली. या सर्व मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

असा झाला छळ
 कामासाठी कोठे नेले याची माहिती लपवून ठेवली
 दिवसभर कारखान्यांत राबवून घेतले, मजुरी अत्यल्प
 अनेकदा मजुरीही नाही
 घरी जाण्याचीही परवानगी दिली नाही

Web Title: Melghat Child Gujrat