मेळघाटातील डॉक्‍टरांचेच आरोग्य धोक्‍यात

राज इंगळे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

अचलपूर (जि. अमरावती) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अस्थायी भरारी व फिरत्या पथकांमध्ये कार्यरत डॉक्‍टर आदिवासीबहुल आणि अतिदुर्गम अशा डोंगराळ मेळघाटात गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सेवा देत आहेत. त्यांच्यापुढील संकटांची मालिका काही केल्या कमी होत नाही. या संकटांचा सामना करीत गेल्या सहा वर्षांमध्ये पाच डॉक्‍टरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मेळघाटचे आरोग्य कसे सुधारणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आदिवासी भागात एमबीबीएस डॉक्‍टर सेवा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आरोग्यसेवेचा डोलारा बीएएमएस डॉक्‍टरांवरच अवलंबून आहे. विशेष म्हणजे, गेल्या सहा वर्षांत मेळघाटातील आदिवासींची सेवा करीत असताना पाच डॉक्‍टरांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. मानसिक तणावामुळे होणाऱ्या आजारांसह अपघातामुळेही आतापर्यंत पाच डॉक्‍टरांचा मृत्यू झाला. डॉ. रवी झारेकर, डॉ. प्रमोद वारजूरकर, डॉ. कृष्णा मरसकोल्हे, डॉ. राजेश बानते, डॉ. आंडे यांचा यात समावेश आहे. तीन ते चार डॉक्‍टर गंभीर आजाराने त्रस्त आहेत. आदिवासी बांधवांची आरोग्यसेवा करणाऱ्या या डॉक्‍टरांवरच योग्यवेळी योग्य उपचार होत नसल्याची बाब गंभीर आहे. आर्थिकदृष्ट्या त्यांना काही उपचार परवडण्याजोगे नाही. औषधांचा खर्च प्रचंड आहे. वेतनसुद्धा वेळेवर होत नाही; त्यामुळे ही वेळ आली आहे.
सध्या मेळघाटची आरोग्यसेवा भरारी, अस्थायी तथा फिरत्या पथकाच्या भरवशावर सुरू आहे. या ठिकाणी बीएएमएस डॉक्‍टर काम करीत आहेत. पैकी सर्वांत कमी वेतन भरारी पथकाच्या डॉक्‍टरांना आहे. अशास्थितीत काम करताना डॉक्‍टरांच्या आरोग्यास हानी पोचल्यास परिवाराला आरोग्य विभागाकडून एकाही रुपयाची मदत केली जात नाही. त्यामुळे डॉक्‍टरांच्या कुटुंबाला हलाखीचे जीवन जगावे लागते. परिणामी डॉक्‍टरांच्या परिवाराला आरोग्य विभागातर्फे सुरक्षाकवच म्हणून 30 लाखांचा विमा देण्याची मागणी मेळघाटातील कार्यरत डॉक्‍टरांनी केली आहे.

Web Title: melghat news