वतन के वास्ते वतन के नौजवान शहीद हो! पोलिस मुख्यालयात साकारले शहिदांचे शौर्यस्थळ

smruti.
smruti.

गडचिरोली : शत्रू जसा सीमेपार असतो तसा सीमेच्या आतही असतो आणि देशाचा सैनिक सतत तळहातावर शिर घेऊन त्या शत्रूशी लढण्यास तत्पर असतो. डोळ्यात तेल घालून सारे सैनिक देशाचे रक्षण करीत असतात. अनेक सैनिकांना देशरक्षण करताना वीरगती प्राप्त होते. त्या सैनिकांची स्मृती देशवासीयांना सतत प्रेरणा देत राहते.

जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबविताना आजपर्यंत २१२ जवानांनी आपले बलिदान दिले असून या जवानांचे शौर्य व पराक्रम कायम स्मरणात राहावा. तसेच त्यांच्या आठवणी सदैव प्रेरणा देत राहाव्या, यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून 'शौर्य स्थळ' या वास्तूची उभारणी करण्यात आली. गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या या शौर्यस्थळाचे उद्‌घाटन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहीद कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, सहायक पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यासह इतर पोलिस अधिकारी/कर्मचारी तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, गडचिरोली पोलिस दलातील शहीद पोलिस जवानांच्या शौर्याचे स्मरण करीत, या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेले शौर्य स्थळ गडचिरोली जिल्ह्यातील जवानांना नक्षलविरोधी लढ्यासाठी नक्कीच प्रेरणा देत राहील. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना गडचिरोली पोलिस दलाच्या जवानांची शौर्य गाथा 'शौर्यस्थळा'च्या माध्यमातून समजुन घेता येईल. याकरिता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या शौर्य स्थळाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही यावेळी पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी केले. गडचिरोली पोलिस दलाने उभारलेल्या शौर्य स्थळ या वास्तुमध्ये नक्षलविरोधी लढ्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याचे व अप्रतिम कामगिरीचे लेखन करण्यात आलेले असून या शहीद जवानांच्या शौर्याच्या गाथा सांगणाऱ्या चित्रफितीही तयार करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक, राष्ट्रपती शौर्य पदक आदी प्राप्त झाले आहे, त्यांच्या नावांचा उल्लेखही शौर्य स्थळामध्ये करण्यात आला आहे. गडचिरोली पोलिस दलाने जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसह प्रत्येक घटकासाठी राबविलेल्या नावीन्यपूर्ण योजनांनाही शौर्यस्थळांमध्ये स्थान देण्यात आले आहे.

पोलिस रुग्णालयाचे नूतनीकरण
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते पोलिस हॉस्पिटलचे नूतनीकरण व बहुउद्देशीय चिकित्सा केंद्राचा उद्‌घाटन सोहळाही पार पडला. रुग्णालयामध्ये रुग्णांकरिता सर्व सोयी- सुविधा एकाच ठिकाणी प्राप्त व्हाव्यात व गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या जवानांना तत्काळ उपचार मिळावेत, या उद्देशाने पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्या संकल्पनेतून या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक मशिनरीसह तज्ज्ञ डॉक्‍टरांची टिम सदैव सेवेत राहणार असल्यामुळे या रुग्णालयाचा फायदा जिल्हाभरातील पोलिस अधिकारी व त्यांचे कुटुंबीयांना होणार आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com