'दोन ते अडीच महिन्यांपासून मजुरीच मिळाली नाही, आम्ही खायचे काय?'

सूरज फुसाटे
Thursday, 22 October 2020

आगरगाव येथील काही मजूर नियमित मनरेगाचे कामावर जायचे. पण, लॉकडाउनच्या काळातील गेल्या दोन ते अडीच महिन्याच्या कामाचे मस्टर आले नसल्याने काम करणारे मजूर संतापले आहेत.

आगरगाव (जि.वर्धा): गेल्या अनेक वर्षांपासून मनरेगाचे काम सुरू  आहे. त्यामध्ये आगरगावातील काही मजूर काम करतात. परंतु, लॉकडाउनच्या काळातील दोन ते अडीच महिन्यांची मजुरी त्यांना अद्याप मिळाली नाही. रोजगार सेवक आणि अधिकारी आज मजुरी मिळेल उद्या मिळेल, असे आश्‍वासन देतात. पण मजुरी काही मिळत नाही. त्यामुळे आता या मजुरांचा संताप वाढत आहे.  

आगरगाव येथील काही मजूर नियमित मनरेगाचे कामावर जायचे. पण, लॉकडाउनच्या काळातील गेल्या दोन ते अडीच महिन्याच्या कामाचे मस्टर आले नसल्याने काम करणारे मजूर संतापले आहेत. मस्टर न निघाल्याने घरी खायचे काय? असा प्रश्‍न मजुरांना पडला आहे. रोजगार सेवक तसेच तांत्रिक अधिकाऱ्यांना विचारले असता, दोन-चार दिवसात पैसे जमा होईल, असे आश्‍वासन दीड महिन्यांपासून मजुरांना दिले जात आहे. कामावरील सर्व मजुरांची या चालू महिन्यातील फक्त एक मस्टर म्हणजे एक आठवडा केलेल्या कामाचे पैसे जमा झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे, दोन्ही महिन्याचे मस्टर लवकर जमा करा, अशी मागणी मजुरांनी केली आहे.

हेही वाचा - अखेर विरुर वनक्षेत्रात पीआरटी पथकाची स्थापन, वाघ-मानव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाचा पुढाकार

मजुरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह - 
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगाचे काम सुरू आहे. मात्र, असाच प्रकार अनेक मजुरांसोबत घडत आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीसुद्धा काही मजुरांची चार ते पाच महिन्याचे मस्टर रखडले होते. त्यामुळे, अनेक मजुरांनी काम देखील सोडले आहे. त्यामुळे, लॉकडाउनपासून न मिळालेल्या मजुरीबाबत रोजगार सेवक तसेच तांत्रिक अधिकाऱ्यास विचारपूस केली असता, टाळाटाळ करीत असल्याची तक्रार मजूर करतात. त्यामुळे, रखडलेले पैसे मिळणार तरी कधी? असा प्रश्‍न मजूर करीत आहेत.

हेही वाचा - भावाचा अपघात झाला अन् गृहद्योग सुरू केला, आज ५००...

येत्या आठवड्यात पगार होतील -

काही दिवसांपूर्वी गटविकास अधिकाऱ्यांची बदली झाली. आता नवीन अधिकारी आले आहेत. येत्या आठवड्यात मनरेगात काम करणाऱ्यांचे पगार मिळतील. 
- विजय पचारे, तांत्रिक अधिकारी, मनरेगा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mgnreaga workers not get honorarium from latest three months in wardha