अगा जे घडलेचि नाही!

नागपूर - भालदारपुऱ्यातून दोन युवकांना अटक केल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी करताना नागरिक.
नागपूर - भालदारपुऱ्यातून दोन युवकांना अटक केल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी करताना नागरिक.

नागपूर - मिलिटरी इंटेलिजन्सने (एम.आय.) गणेशपेठमधील भालदारपुऱ्यात केलेल्या ऑपरेशनवर संभ्रम निर्माण झाला आहे. कारवाईबाबत पोलिस आणि अन्य विभागांमध्ये एकसूत्रता नाही. त्यामुळे ही कारवाई खरंच झाली की लवपाछपवी केली जात आहे, असा प्रश्‍न पडला आहे. दुसरीकडे पोलिस आयुक्तांनी अफवा असल्याचे सांगितल्याने नेमके खरे काय, याबाबत उत्सुकता ताणली आहे. 

शुक्रवारी सायंकाळी मिलिटरी इंटेलिजन्सने गणेशपेठमधील भालदारपुरा परिसरातील दोन युवकांना आयएसआयशी संबंध असल्याच्या संशयातून उचलण्यात आल्याची चर्चा होती. हे ऑपरेशन एमआयने अतिशय गोपनीय ठेवले होते. यानंतर एसआयडी, सीआयडी, एटीएस, एसबी आणि अन्य गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि गणेशपेठ पोलिसही भालदारपुऱ्यावर लक्ष ठेवून होते. मात्र, आतापर्यंत कोणत्या दोन युवकांना उचलले, याबाबत माहिती मिळाली नाही. एमआयने दोन्ही युवकांना ताब्यात घेतल्यानंतर गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंद केल्याची चर्चा होती. मात्र, गणेशपेठचे ठाणेदार सुनील गांगुर्डे यांनी पोलिस स्टेशन डायरीवर कोणत्याही प्रकारची एन्ट्री नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ऑपरेशन झाले नाही, असे स्पष्ट होते. 

एका फोनने घोळ?
गणेशपेठ पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी एका व्यक्‍तीचा लॅंडलाईनवर फोन आला. त्याने मुंबई एमआय विभागातून बोलत असल्याचे सांगितले. शुक्रवारी गणेशपेठ हद्दीत ‘ऑपरेशन’ राबविणार असल्याचे सांगितले. त्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत लागेल, असे त्याने सांगितले. त्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी वरिष्ठांना माहिती दिली. तसेच संबंधित गुप्तचर विभागालाही माहिती दिली. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा गणेशपेठ पोलिस ठाण्यात फोन आला. ऑपरेशन फत्ते झाले असून, भालदारपुऱ्यातील दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना कामठी मिलिटरी कंटोन्मेंटमध्ये नेत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. शेवटी कुणीतरी व्यक्‍तीने फोन करून एवढे मोठे ‘कांड’ घडविल्याची माहिती समोर आली, असे सूत्रांनी सांगितले.

नागरिकांमध्ये असंतोष 
या प्रकाराने भालदारपुऱ्यातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. कुणाला उचलले? हा प्रश्‍न एकमेकांना विचारला जात आहे. मात्र, वस्तीतील कुणीही युवक बेपत्ता नाही किंवा कुणाला ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आज शनिवारी दुपारी दोन वाजता जवळपास शंभर लोकांचा जमाव भालदारपुरा पोलिस चौकीसमोर जमा झाला. ही अफवा असून भालदारपुऱ्याला बदनाम करण्याचे कटकारस्थान असल्याचे सांगितले.

अशा प्रकारचे कोणतेही ऑपरेशन गणेशपेठमध्ये झाले नाही. ऑपरेशन झाले ही केवळ अफवा आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्‍वास ठेवू नये. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस आयुक्‍त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com