शहरातून परतलेल्या मजुरांना काम मिळेना; शेकडो मजुरांच्या कुटुंबासमोर पोटाचा प्रश्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातून परतलेल्या मजुरांना काम मिळेना;  उपासमारीची वेळ

शहरातून परतलेल्या मजुरांना काम मिळेना; उपासमारीची वेळ

सिहोरा (जि. भंडारा) : राज्यात कोरोना (Maharashtra Corona Update) वाढत असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली आहे. शेकडो मजूर (Migrant workers) शहरातून गावाकडे परत आले आहेत. आता दीड महिना होत आला तरी गावात त्यांना काम मिळेनासे झाले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकतर शेतीची कामे कित्येक वर्षापासून सुटल्याने त्यांना गावात कामही मिळेनासे झाले आहे. (Migrant workers are not getting jobs in villages)

हेही वाचा: महापालिकेनं खासगी कंपनीला दिलेले ४६ लाख पाण्यात? जनजागृतीच नाही

राज्यात करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढताच शेकडो मजुरांनी दुसऱ्या लाटेत गावाकडे धाव घेतली. पहिल्या लाटेत अनेकांना वाहनांअभावी पायी यावे लागले होते. यावेळेस वाहनांची सुविधा होती. परंतु, आता गावात काम मिळणे कठीण झाले आहे. तुमसर तालुक्‍यातील सिहोरा-बपेरा परिसरातून शेकडो मजूर कामाच्या शोधात नागपूर, मुंबईसह विविध ठिकाणी जातात. परंतु, गत वर्षापासून कोरोना संसर्गामुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य शासन कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंभीर असले तरी, नागरिकांना मात्र वाऱ्यावर सोडत आहे. पहिल्या लाटेत गावातच रोजगार प्राप्त झाले होते. रोजगार हमी योजना आणि शेतीची कामे सुरू होती. शहरातून गावात परतलेल्या मजुरांना गावकऱ्यांनी आधार व आसरा दिला होता. परंतु, अधिक दिवस रोजगार उपलब्ध झाला नसल्याने पुन्हा मजुरांचे लोंढे नागपूरच्या दिशेने निघाले होते. नागपुरात काम करून संसाराचा गाडा रेटू लागले.

अशातच पुन्हा दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाने डोकेवर काढण्यास सुरुवात केल्याने उपराजधानीत लॉकडाउन सुरू झाले. कुशल कामे थांबविण्यात आली असल्याने मजुरांना काम मिळेनासे झाले आहेत. रोजगार हिरावल्याने मजूर पुन्हा गावाकडे परत आले आहेत.

जवळच्या मध्य प्रदेशातील जिल्ह्यांसह सिहोरा-बपेरा परिसरातील मजूर आपल्या गावात परत आले आहेत. परंतु, त्यांना गावात रोजगार नसल्याने उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेच्या कामांना सुरुवातही झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणाचा फटका मजुरांना बसला आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी माजी सभापती धनेंद्र तुरकर यांनी केली आहे.

हेही वाचा: चुकीच्या पद्धतीनं कधीच तपासू नका ब्लड प्रेशर; जाणून घ्या योग्य पद्धत

रोहयोचे कामे ठरू शकतात आधार

संचारबंदीने शहरातून गावात आलेल्या मजुराचे हात रिकामे आहेत. दिवसभर घरात बसून ही मंडळी आता कंटाळली आहे. कुठे काम मिळते काय? याचा शोध घेत आहेत. पण, शेती कामाची सवय नसलेल्या या मजुरांना गावात काम मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आधार ठरू शकते. शासनाने अनेक कामे मंजूर केली आहे. परंतु अनेक गावातील कामांना सुरुवात झाली नाही. कोरोना संचारबंदीच्या काळात नियमाचे पालन करून रोजगार हमी योजनेची कामे सुरू केल्यास स्थलांतरित मजुरांना फायदा होऊ शकतो.

(Migrant workers are not getting jobs in villages)

loading image
go to top