फुटबॉल खेळले म्हणून लाखोंना ठार मारले!

file photo
file photo

नागपूर : वरिष्ठ अधिकाऱ्यांना न विचारता फुटबॉल सामना खेळले म्हणून लाखो निरपराध लोकांना जीव गमवावा लागला, हे ऐकूण नक्‍कीच आश्‍चर्य वाटेल. परंतु, ही घटना दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी बेल्जियममध्ये घडली होती. जिथे हा नरसंहार घडला, त्या ठिकाणाला नागपूरच्या झोपडपट्टी फुटबॉलपटूंनी "ग्लोबल पीस गेम्स'निमित्त नुकतीच भेट दिली. केवळ भेटच दिली नाही तर त्या ऐतिहासिक स्थळी विविध देशांच्या खेळाडूंसोबत मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळून जगभर शांतीचा संदेशही पोहोचविला. 
बेल्जियमच्या मेसेन शहरात नुकतेच "ग्लोबल पीस गेम्स' पार पडले. यात भारतासह 10 देशांतील झोपडपट्टी फुटबॉलपटूंनी सहभाग नोंदविला. सात सदस्यीय भारतीय संघात नागपूरच्या बादल सोरेन, उमर शेख व प्राची गरगेलवारचा समावेश होता. नागपूरचेच पंकज महाजन संघाचे प्रशिक्षक होते. स्पर्धेनंतर सर्व संघांनी "पीस व्हीलेज'मध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात भाग घेतला. पंकज व बादलने "पीस व्हीलेज'मधील इतिहास, थरारक व धक्‍कादायक अनुभव दै. "सकाळ'शी शेअर केलेत. 
जर्मनी व इंग्लंड मित्र देशांमध्ये झालेल्या पहिल्या महायुद्धाच्या वेळी एक दिवस (ख्रिसमसच्या दिवशी) युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सैनिकांनी गिफ्ट म्हणून फुटबॉल दिल्यानंतर त्यांनी मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळण्याचा निर्णय घेतला. सामना झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैनिक आपापल्या ठिकाणी जात असताना जनरलने त्यांना फुटबॉल मैदानावर परत जाण्यास सांगितले. काही कळायच्या आत दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी (जनरल) बेछूट गोळीबारचा आदेश देऊन फुटबॉल खेळणाऱ्यांसह असंख्य निरपराध सैनिकांना गोळ्या घालून ठार मारले. आम्हाला न विचारता तुम्ही शत्रूंसोबत फुटबॉल का खेळले, म्हणून दोन्ही अधिकाऱ्यांनी हे हत्याकांड घडवून आणल्याची माहिती पंकज व बादलने दिली. 
जालियनवाला बाग नरसंहाराची आठवण करून देणाऱ्या त्या घटनेत इंग्लंड, जर्मनीचे लाखो सैनिक मारले गेले. इंग्रजांकडून युद्धात सहभागी झालेल्या भारताच्या 76 हजार सैनिकांनाही प्राण गमवावे लागले. उल्लेखनीय म्हणजे, सामना पाहायला गेलेल्या निरपराध महिला व पन्नासावर भारतीय मुलेही त्यात मारले गेली. त्या दिवशी अक्षरश: रक्‍ताचा सडा व मृतांचे खच पडले होते. मृतांना मेसेनमध्ये दफन करण्यात आले. आजही जमीन खोदली की मृतांचे सांगाडे बाहेर पडतात. त्या प्रसिद्ध स्थळालाच "पीस व्हीलेज' संबोधले जाते. मृतांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मेमोरियल बनविले आहे. त्या घटनेच्या निमित्ताने या ठिकाणी दरवर्षी संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शनात मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळला जातो. आम्हाला ते स्थळ जवळून पाहता आले व तिथे फुटबॉल खेळलो याचा आनंद आहे. पण, त्याचवेळी त्या घटनेचा इतिहास ऐकून दु:खही झाल्याचे पंकज व बादलने सांगितले. जगभरातील लोक या स्थळाला नियमित भेटी देऊन आदरांजली वाहत असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com