शेतकऱ्यांच्या नावे उचलले कोट्यवधींचे कर्ज

file photo
file photo

वणी (जि. यवतमाळ)  : येथील वणी-भालर रोडवर जी. एस. ऑइल मिलमधून दोन ते तीन वर्षांपर्यंत सोयाबीनपासून तेल व इतर पदार्थ बनविण्याचे काम सुरू होते. या कंपनीच्या संचालकांनी अनेक शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधींचे कर्ज काढून कंपनी बंद केली. कर्ज न भरल्याने बॅंकेने कंपनीला कुलूप लावले. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी "सीबीआय'चे पथक वणीत दाखल झाले आहे.
"सीबीआय'च्या तपासात कर्जधारक शेतकऱ्यांची नावेच बोगस असल्याचे निष्पन्न होत असून, बॅंकेला या कंपनीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे निष्पन्न होत आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी दोन दिवसांपासून "सीबीआय'च्या नागपूर शाखेच्या निरीक्षक कविता इसनकर आपल्या पथकासह वणीत ठाण मांडून आहेत. ज्या व्यक्तीच्या नावावर बॅंकेतून कंपनीने कर्ज घेतले आहे. त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी वणी, मारेगाव, झरी या तालुक्‍यातील संबंधित तलाठी, मंडळाधिकारी यांना बोलावून चौकशी करण्यात येत आहे.आदिलाबाद येथील गौरी शंकर यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या जी. एस. ऑइल मिलने जवळजवळ 20 शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवून शेतकऱ्यांच्या नावावर प्रत्येक 70 ते 80 लाख रुपये कर्ज उचलले. या कर्जाची परतफेड न करता कंपनीने दिवाळे काढले. बॅंकेने कंपनी ताब्यात घेऊन तिला सील लावले व संचालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी वणी पोलिसांनी गौरी शंकर यांना अटक करून वणीत आणले होते. त्यानंतर हा कर्जघोटाळाचा तपास "सीबीआय'कडे सोपविण्यात आला. बॅंकेकडून कर्ज घेताना कंपनीतर्फे शेतीचे दिलेले सात-बारा उतारे, शेतकऱ्यांची नावे अस्तित्वातच नाहीत, असे चौकशीत निदर्शनास येत आहे.
"त्या' 20 शेतकऱ्यांची नावे कर्ज
वणी तालुक्‍यातील घोन्सा येथील 20 शेतकऱ्यांच्या बॅंकेत सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता "सीबीआय'तर्फे पडताळून पाहण्यात येत आहे. घोन्सा येथील लक्ष्मिकांत गड्डमवार, तानाजी चांदेकर, सुदर्शन बर्वे, बापूराव पोलसवार, हरिदास उत्तरवार, रमेश रेड्डीवर, अरविंद बोबडे, अविनाश राठोड, नदीम, शिवा राकेश गेंडे, अनिल पंधरे, जोसेफ, राहुल येलपुलवार, माणिक कडू, कांताराम टिकले आदी शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज उचलण्यात आले आहे. यापैकी एकही शेतकरी घोन्सा येथील नसल्याचे तलाठी यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात घोन्सा येथील सरपंच, उपसरपंच, तलाठी यांच्यासह वणी, मारेगाव व झरी या तालुक्‍यांतील महसूल कर्मचाऱ्यांना बोलावून "सीबीआय'तर्फे चौकशी सुरू आहे. या प्रकरणात "सीबीआय'तर्फे कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com