खरेदी केंद्रावरील कोट्यवधीचे धान सडले 

file photo
file photo

गोंदिया : कधी पावसाचा तर कधी बारदान्याचा फटका धानउत्पादकांना बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. खरेदी केंद्रावरील धानाला ठेवण्यासाठी गोदामे नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाच्या दुर्लक्षितपणाचा फटका सर्वत्र शेतकऱ्यांना बसत आहे. 
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात धानपिक मोठ्‌याप्रमाणात घेतले जाते. यावर्षी गोंदियात जिल्ह्यात धानाचे पीक जोमात आले.

2 लाख हेक्‍टर पेक्षाअधिक भागामध्ये भाताची रोवणी करण्यात आली. दिवाळीमध्ये पावसाने फटका दिला. त्यामुळे धान सुकण्याच्या मार्गावर होते. कसेबसे धानाचे सिंचन करून शेत जगविली. मात्र, धान कापणीवर असताना अचानक अवकाळी पावसाने दगा दिला. शेतकऱ्यांचे धान शेतात सडायला लागले. यातही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने याकडे लक्ष दिले नाही. शासनाने तत्काळ दुष्काळी मदत देण्याची गरज होती. परंतु, सरकार सत्तास्थापनेमध्ये मग्न होते. 

70 केंद्रावर धान खरेदी 

दोन महिन्यांपूर्वी धान खरेदी केद्र सुरू झाले. गोंदियात 70 धान खरेदी केंद्र सुरू आहेत. परंतु, या केंद्रावर सोयीसुविधांचा अभाव आहे. कोट्‌यवधी रुपयांचे धान खरेदी केंद्रावर पडून आहे. सरकारला त्याचे काहीही सुतक नाही. दरवर्षी धानखरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना धानाचे विकायला आणतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून त्या सुविधा केंद्रावर सुविधा देण्यात सरकारला अपयश आले आहे. यावर्षी अवकाळी पाऊस झाला. पावसामध्ये शेतकऱ्याचे धान भिजले आणि त्यातून कोंब बाहेर येऊ लागले. यातूनही मोठे नुकसान झाले आहे 

बारदान्याचा प्रश्‍न दरवर्षी 

गेल्या अनेक वर्षांपासून बारदान्याचा प्रश्‍न सुटत नाही. लाखो क्‍विंटल धानाचे उत्पादन होत असताना सरकार शेतकऱ्यासाठी बारदाण्याचे सोय करून देत नाही. बारदान्याची किमत अधिक असल्यामुळे फेडरेशनला घेणे परवडत नाही, असा सल्ला काही अधिकारी देतात. परंतु, फेडरेशनपेक्षा अधिक नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे. याकडे कोणाचे लक्ष नाही. गेल्या वर्षी आमदार नीलम गोऱ्हे यांनी बारदाण्याचा प्रश्‍न विधानसभेत मांडला होता. एवढेच नव्हे तर सहकार मंत्र्याकडून यावर चर्चा घडवून आणली होती. मात्र, यानंतरही हा प्रश्‍न सुटला नाही. 

अवकाळीने आणले डोळ्‌यात पाणी 

गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सरकारचे धान खरेदी केंद्रावर कोणतेही नियोजन नसल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वर्षीसुद्धा अवकाळी पाऊस झाला. पोत्यातील धानाला कोंब फुटले. सरकारने धानाच्या किमतीत काही वाढ केली असली तर पावसामुळे जे नुकसान झाले. ते वाढलेल्या किमतीपेक्षा अधिक आहे. 


हिनाभरापासून खरेदी केंद्रावर धान पडून आहेत. अवकाळी पावसातून कसेबसे धान भिजण्यापासून वाचविले. दररोज केंद्रावर येरझाऱ्या घालावे लागते, पण क्रमांक काही लागत नाही. 
प्रदीप गजापुरे,नवेगावबांध. 

केंद्रावर गर्दी तर खूप आहे,महिना दीडमहिन्यांपासून धानविक्रीसाठी पडले आहेत. इथेही वशिलेबाजी चालते. मोजमाप करण्यासाठी चारशे ते पाचशे रुपये,धानमोजणी झाल्यावर पावती फाडणारे कर्मचारी पाचशे रुपये मागतो. आधीच दुष्काळ परिस्थितीमुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांनी काय करावे. तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे शोषण थांबवावे. 
रामदास कापगते,नवेगावबांध. 

 खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांनी तीस-चाळीस सातबारा यांची नोंद पूर्वीच करून ठेवल्यामुळे संस्थेचे सभासद आपला धान वेळेच्या आत विक्री करू शकत नाही. दुसरीकडे व्यापारी सावकार शेतकऱ्यांकडे पैशाचा तगादा लावत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला धान कमी भावात नाइलाजास्तव व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. अनेक खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून पैशाचीसुद्धा मागणी केल्यानंतरच धान्य मोजण्यात येत आहे. हा सावळा गोंधळ त्वरित थांबला पाहिजे. याकरिता लोकप्रतिनिधी व प्रशासनाने वेळीच पावले उचलली पाहिजेत. 
सतीश कोसरकर, शेतकरी,पांढरवाणी(मालगुजारी). 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com