Nagpur Municipal
Nagpur Municipal

मिनीबसच्या नुसत्या घोषणाच

नागपूर - मनपाच्या परिवहन विभागाने बुधवारी २८१ कोटी ९९ लाखांचा अर्थसंकल्प समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्याकडे सादर केला. सलग तिसऱ्या वर्षी ४५ मिनीबस सुरू करण्याचा संकल्प यंदाही करण्यात आला. महिलांसाठी इलेक्‍ट्रिकवर चालणाऱ्या पाच मिनी तेजस्विनी बसेस, मनपाच्या ५० स्टॅण्डर्ड बसेसचे परिवर्तन बायो सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

मिनी बसची घोषणा करून तीन वर्षे झाली. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा ताबडतोब मिनी बस सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत. मात्र, परिवहन विभागाचे अधिकारी सातत्याने चालढकल करीत आहेत. महापालिका आयुक्तांकडे स्वाक्षरीसाठी प्रस्ताव गेल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांच्या कक्षातून मिनी बसची फाइल सुटतच नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शासनाच्या धोरणानुसार महिलांसाठी इलेक्‍ट्रिकवर चालणाऱ्या पाच मिनी तेजस्विनी बसेस, पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने मनपाच्या ५० स्टॅण्डर्ड बसेसचे परिवर्तन बायो सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याचा नागपूरचा मानस आहे. याशिवाय प्रतिबस ऑपरेटर १५ मिनी बसेसप्रमाणे एकूण तीन डिझेल बस ऑपरेटरकडून एकूण ४२ मिनी बस शहरबस सेवेत दाखल होणार आहेत. या मिनी बसेस शहरातील लहान मार्गांवर संचालित करून मेट्रो स्टेशन व बसस्थानकापर्यंत सेवा देणार आहेत.

शहीद कुटुंबीय, दिव्यांगांना मोफत प्रवास
लष्कर, निमलष्कर दल, पोलिस दलातील देशासाठी कर्तव्यावर तैनात असताना शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबातील शहिदांच्या वीर माता, वीर पत्नी व मुलांसह दिव्यांग बांधव व त्यांच्या सोबतच्या साथीदाराला नि:शुल्क प्रवासाची सुविधा उपलब्ध राहील.

कॉमन मोबिलिटी कार्ड
शहर बसेस व मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’ योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शहर बस व मेट्रो रेल्वेचा सलग वापर प्रवाशांना करता येणार आहे. याशिवाय नव्याने कोराडी मंदिरजवळ एक बस डेपो एनआयटी, एनएमआरडीएतर्फे विकसित करण्यात येत असून, सदर डेपो शहर बस सेवेत लवकरच दाखल करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com