खड्ड्यात पडून खाण कामगाराचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

चिखला भूमिगत खाणीत प्रत्येक कामगार सुरक्षा उपकरणांचा वापर करतो. दिलीप सोनवाणे यानेसुद्धा ही साधने वापरली होती. खाण प्रशासनाच्या नियमानुसार मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येईल. 
- आनंदकुमार चौकसे, खाण व्यवस्थापक 

तुमसर (जि. भंडारा) - सिमेंट पाइपची दुरुस्ती करताना तोल गेल्याने तीस फूट खोल खड्ड्यात पडून दिलीप तुकाराम सोनवाणे (वय 26) या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना घटना चिखला भूमिगत खाणीत शुक्रवारी दुपारी घडली. 

चिखला येथे मॅगेनीजची प्रसिद्ध खाण आहे. या खाणीचे कंत्राट अंबिका मायनिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला दिले आहे. कंपनीमार्फत कंत्राटी तत्त्वावर काम करणारे 10-12 जण सकाळी साडेसहाला खाणीकडे गेले. सिमेंट पाइप चोक झाल्याने दुरुस्ती करण्यासाठी दिलीप सोनवाणे वर चढला. दुरुस्ती करीत असताना तोल गेल्याने तो थेट 30 फूट खोल खाणीत पडला. दगडावर पडल्याने तो जबर जखमी झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. 

खाण शुक्रवारी बंद असते. परंतु दुरुस्तीचे काम असल्याने 10-12 जणांना कामावर बोलविण्यात आले होते. या खाणीत 300 कंत्राटी कुशल-अकुशल कामगार काम करीत आहेत. यापूर्वीही असे अपघात घडल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कामावर असताना कामगारांनी हेल्मेट, सुरक्षा बेल्ट वापरणे गरजेचे आहे. परंतु काही कामगार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समजते. मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत तसेच एकाला नोकरी देण्याची मागणी चिखलीचे सरपंच दिलीप सोनवाने, पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार यांनी केली आहे. 

Web Title: Mining workers died falling into a pit