Video: राज्यमंत्री बच्चू कडूंनी अपघातग्रस्तांचे वाचवले प्राण.. स्वतः च्या वाहनाने आणले रुग्णालयात 

शशांक देशपांडे
Friday, 4 September 2020

आसपासच्या लोकांनी १०८ या रुग्णवाहिकेला ङ्कोन करून कळविले. मात्र कोणतीही मदत आली नाही, अपघात परिसर रक्ताने माखला होता, जवळपास कोणतेही रुग्णालय नसल्याने मदत मिळणे अशक्य होते.

दर्यापूर (जि. अमरावती) : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रस्त्यावर मरणासन्न अवस्थेत पडलेल्या व मदतीची आस लावून असलेल्या अपघातग्रस्त युवकांना वाचवीत चक्क आपल्या वाहनात टाकून दर्यापुरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यामुळे रुग्णालय प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ उडाली.

अमरावती दर्यापूर मार्गावरील आराळाट्यावर आज ४ सप्टेंबर रोजी ११ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोन युवक व एक युवती जखमी झाले. त्याच वेळेस राज्यमंत्री बच्चू कडू हे त्याच मार्गावरून दौ-यावर येत असताना अपघात झाल्याचे त्यांचा निदर्शनास आले. अपघातग्रस्त युवक रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत रस्त्यावर पडून विव्हळत होते. 

अधिक माहितीसाठी - सुमितचा गणेश देखावा ठरला अव्वल! यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा

आसपासच्या लोकांनी १०८ या रुग्णवाहिकेला ङ्कोन करून कळविले. मात्र कोणतीही मदत आली नाही, अपघात परिसर रक्ताने माखला होता, जवळपास कोणतेही रुग्णालय नसल्याने मदत मिळणे अशक्य होते. राज्यमंत्री बच्चू कडू यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी आपले वाहन थांबवून क्षणाचाही विलंब न करता जखमींना तत्काळ आपल्या स्वतःच्या वाहनात दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

 

 

बच्चू कडू दिसताच रुग्णालय प्रशासन अलर्ट झाले, नागरिकांनी सुद्धा उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. जखमी युवकांना तातडीने उपचार सुरू झाले, यापैकी एका महिला रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने तातडीने अमरावतीला पाठविण्यात आले.

हेही वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या सामाजिक कार्याचा परिचय दिल्याने रुग्णांना तातडीने उपचार देणे शक्य झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. अपघातग्रस्तांमध्ये दिनेश सांगोले आराळा, धनश्री तायडे, राजेश गावंडे (रा. धामोडी) यांचा समावेश आहे. उपचारानंतर सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील डाबेराव यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister bacchu Kadu saved life of men who met with accident