आमदार होळींविरुद्धच्या याचिकेवर निर्णय सोमवारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

नागपूर -विधानसभेच्या निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉ. देवराव होळी यांनी भाजपकडून निवडणूक लढविली. ते निवडूनही आले. त्यांच्या निवडीला फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून उभे राहिलेले नारायण जांभुळे यांनी आव्हान दिलेल्या याचिकेवर सोमवारी (ता. 16) निर्णय लागणार आहे.

नागपूर -विधानसभेच्या निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉ. देवराव होळी यांनी भाजपकडून निवडणूक लढविली. ते निवडूनही आले. त्यांच्या निवडीला फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून उभे राहिलेले नारायण जांभुळे यांनी आव्हान दिलेल्या याचिकेवर सोमवारी (ता. 16) निर्णय लागणार आहे.

डॉ. देवराव होळी गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत शासकीय सेवेत असताना 2008-09 या कालावधीत त्यांनी स्वत:च्या शकुंतला मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने सिकलसेल प्रकल्प राबविला होता. त्यासाठी संस्थेला 32 लाख 82 हजार रुपये निधी देण्यात आला. त्यासाठी 50 कर्मचारी दाखवून खोट्या दस्तऐवजांच्या आधारे त्यांनी 8 लाख 68 हजार 363 रुपयांची उचल केली, अशी तक्रार तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चामोर्शी पोलिस ठाण्यात केली होती. त्याअनुषंगाने डॉ. देवराव होळी यांच्यासह संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच डॉ. होळी यांनी शासनाची पूर्वपरवानगी न घेता सार्वजनिक संस्थेचे साहचर्य केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1979 नुसार व शासनाच्या रकमेची अफरातफर केल्याने डॉ. होळी यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी 14 ऑक्‍टोबर 2013 ला कळविले होते.

पुढे राजीनामा नामंजुरीला आव्हान देत डॉ. होळी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण नागपूर येथे याचिका दाखल केली, तेव्हा प्राधिकरणाने होळी यांची याचिका खारीज केली. या सर्व बाबींच्या अनुषंगाने नारायण जांभुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याप्रकरणी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झाले असून, अपुऱ्या वेळेमुळे सोमवारी निर्णय पूर्ण करण्यात येणार आहे. जांभुळे यांच्यातर्फे ऍड. प्रदीप वाठोरे, तर होळींतर्फे ऍड. गणेश खानझोडे कामकाज पाहत आहे.

Web Title: MLA Holi petition decision on tommarrow