‘तू मला नाही तर, मी तुला नाही’; तीन बाय सहा इंच डिस्प्लेने तरुणांना ग्रासले

बबलू जाधव
Tuesday, 2 March 2021

सोशल मीडियाला शॉर्टकट म्हणून वापरले जात आहे. परंतु, कमी लाइक्‍स, कमेंट मिळाल्या तर निराशा वाढते आणि जास्त मिळाल्या तर त्याच विश्‍वात गुरफटून जात असल्याचे दिसून येते.

आर्णी (जि. यवतमाळ) : सोशल मीडियामुळे अख्खे जग जवळ आले. दूरच्या माणसाशी संपर्क वाढला. मात्र, जवळचे नाते दुरावत चालले आहे. सोशल मीडियावर कमेंट, व्ह्युव्हज, स्टेट्‌स, लाइक्‍सला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. यात युजर्स अडकत चाचले आहेत. सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाइक्‍स, कमेंट न मिळाल्यास तरुणाई बेचैन होत असल्याचे दिसून येत आहे. ‘तू मला नाही तर, मी तुला नाही’, अशी मानसिकता बळावत चालली आहे.

खास करून तरुणाई या गर्तेत अडकत असल्याने मानसिक आरोग्यासह उज्ज्वल भविष्यही काळवंडण्याचे धोके दिवसेंदिवस वाढत आहेत. तीन बाय सहा इंच मोबाइल डिस्प्लेवर अख्खे विश्‍व संपर्क व माहितीचे जाळे आता सहज उपलब्ध आहे. सोशल मीडियामुळे क्रांती झाली असली तरी हल्ली असंख्य जण त्यातच आकंठ बुडाल्याचे दिसते.

अधिक वाचा - रुग्णालयात सफाईसाठी गेला कर्मचारी; शौचालयाच्या सीटमध्ये सळाख टाकताच बाहेर आले मृत अर्भक

ज्या वयात सकारात्मक विचारांच्या पेरणीची गरज असते, त्या वयात नकारात्मक भावना, चिंता वाढून सहनशीलता क्षीण होण्याची भीती सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे वाढते. युजर्सने एखादी पोस्ट टाकली तर त्यावर सोशल मीडियात कमेंट, लाइक्‍स याला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे, कौतुक, स्तुती करावी, इतरांपेक्षा वेगळे असावे, काहीतरी वेगळे करावे ही धडपड तरुणाईत आहे.

सोशल मीडियाला शॉर्टकट म्हणून वापरले जात आहे. परंतु, कमी लाइक्‍स, कमेंट मिळाल्या तर निराशा वाढते आणि जास्त मिळाल्या तर त्याच विश्‍वात गुरफटून जात असल्याचे दिसून येते. यातून स्वमग्न होणे, एकलकोंडेपणा, निराशा असे परिणाम वाढत असून, ही चिंतेची बाब आहे.

जाणून घ्या - मुलींची निर्वस्त्र पूजा प्रकरण : भोंदूबाबाकडे सापडले शेकडो मुलींचे फोटो; लैंगिक अत्याचाराचा संशय

स्टंट अन्‌ प्रसिद्धी

इन्स्ट्राग्राम, फेसबुक या सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रसिद्ध होण्यासाठी हल्ली तरुणाई विविध व्हिडिओ, सेल्फी अपलोड करीत आहेत. धोक्‍याच्या स्थळी जाऊन व्हिडिओ बनवितात. त्यामुळे आपण प्रसिद्घ होऊ, या मानसिकेतून स्टंटबाजीही केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile changes the mindset of young people Yavatmal news