देशात वीस हजार किमीचे जलमार्ग बांधणार : नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

गडचिरोली : 'कोणत्याही देशाच्या विकासासाठी वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने आवश्‍यक असतात. दळवळणात दिवसेंदिवस क्रांती होत आहे. आपण आतापर्यंत मोठ्या प्रमाणात रस्ते निर्माण केले; पण आता यापुढे मजल मारत देशात जलमार्ग वाहतुकीची सोय करण्याचा मानस आहे. त्यामुळे देशात नद्यांच्या माध्यमातून वीस हजार किमीचे जलमार्ग बांधणार आहेत,' असे सूतोवाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, गडचिरोली हा निसर्गसंपन्न श्रीमंत जिल्हा आहे. मात्र बेरोजगारी, गरिबी यासह विकासात्मक मागासलेपण या प्रमुख समस्या या ठिकाणी आहेत. पुढील काळात वैनगंगेसारख्या मोठ्या नदीच्या माध्यमातून स्वस्त जलवाहतूक सुरू करता येईल का, याची पाहणी केली जाईल. असे प्रकल्प ब्रह्मपुत्रा व उत्तर भारतातील नद्यांवर सुरू आहेत. नागपुरातील तलावांवर सहज उतरू शकेल, अशी विमाने उपलब्ध करायची असून, त्यासाठी 48 आसन क्षमतेचे विमान तयार करणार असल्याचेही गडकरी म्हणाले; तसेच पाणी व जमिनीवर प्रवास करू शकणारी उभयचर (ऍम्फीबियन) बस घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. 

'गडचिरोली जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका येण्यास उदासीन असल्या तरी येथील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. या बॅंकेने आपल्या शाखा जिल्हाभरात वाढवून नागरिकांना लाभ द्यावा,' असे गडकरी म्हणाले. 

कुठल्याही जिल्ह्याचा विकास हा शिक्षण, उद्योग व शेतीच्या विकासावर अवलंबून असतो. तरुणांच्या हाती केवळ पदव्या आल्याने कुठल्याही जिल्ह्याचा विकास होत नाही; तर त्या पदव्या प्राप्त केल्यानंतर मिळालेल्या शिक्षणाचा समाज व जिल्ह्याच्या विकासासाठी कसा उपयोग होतो, यावर विकास अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्‍यकता आहे. 
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

Web Title: Modi Cabinet targets to build waterways of 20 thousand kilometers, says Nitin Gadkari