गडकरी, फडणवीसांची भाषणं हिंदीत, मोदींचे मराठीत!

टीम ई सकाळ
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

उपस्थितांनी आंबेडकरांचा, भारताचा जयजयकार करीत घोषणा द्यायला सुरवात केली. त्यावर नरेंद्र मोदींनी 'आवाज... ऐकायला येतोय का' असे विचारत त्यांना दाद दिली. 

नागपूर : धम्मचक्र परिवर्तनाच्या भूमीला मी अभिवादन करतो, असे शुद्ध मराठीतून बोलत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या मराठी नेत्यांनी मात्र संपूर्ण भाषणे हिंदीतून केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथे दीक्षाभूमीवर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर भीम आधार अॅप्लिकेशन, विविध संस्था, विविध विकासकामांची उदघाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात गडकरी, फडणवीस आणि मोदी यांची प्रमुख भाषणे झाली. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालनही हिंदीतून करण्यात आले. 

मोदींनी मात्र आवर्जून मराठीची कास पकडत भाषणाला सुरवात केली. पुढे ते म्हणाले, "काशी ही प्राचीन ज्ञाननगरी आहे. नागपूरला आपण ज्ञाननगरी बनवू शकतो का?"
त्यावर टाळ्यांचा कडकडाट करीत मोदींच्या मराठी विधानांना दाद दिली. उपस्थितांनी आंबेडकरांचा, भारताचा जयजयकार करीत घोषणा द्यायला सुरवात केली. त्यावर नरेंद्र मोदींनी 'आवाज... ऐकायला येतोय का' असे विचारत त्यांना दाद दिली. 
 

Web Title: modi speaks in marathi, while fadnavis, gadkari in hindi