खासगी संस्थांच्या घशात "मनपा' शाळा टाकू नका 

news about mohalla sabha in nagpur
news about mohalla sabha in nagpur

नागपूर : नागपूर शहरातील सरकारी शाळा वाचविण्याचे आंदोलन आता हळूहळू व्यापक होत आहे. रविवारी सोमलवाडा येथे "प्रभाग 36'मध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने "मोहल्ला सभा' घेतली. "सोमलवाडा मनपा शाळेला कुण्याही कंत्राटदाराच्या घशात घालू देणार नाही', असा ठराव करण्यात आला. सोबतच नागपुरातील काही शाळा खासगी स्वयंसेवी संस्थांना चालवायला दिल्याचा निषेधही करण्यात आला.
 
ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसभांना मोठे महत्त्व असते. त्याचप्रमाणे महानगरपालिका स्तरावर मोहल्ला सभांना कायदेशीर अधिकार असतात. याच अधिकारांतर्गत गेल्या आठवड्यात लोधीखेरा येथे मोहल्ला सभा झाली होती. आता रविवारी सोमलवाडा येथील नागरिकांनी मोहल्ला सभा घेतली. 
प्रारंभी मोहल्ला सभेचे अध्यक्ष म्हणून विजयराव लेंडे यांची निवड करण्यात आली. "सोमलवाडा नागरिक कृती समिती'चे पदाधिकारी नारायणराव रागीट यांनी लेंडे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले. तर, सामाजिक कार्यकर्त्या साधना श्रीवास्तव यांनी अनुमोदन दिले. लेंडे यांच्या अध्यक्षतेखाली मोहल्ला सभेची पुढील कार्यवाही चालली. 

सत्यावथा गोले यांनी प्रारंभी एक प्रस्ताव सभेपुढे ठेवला. त्या म्हणाल्या, ""आमची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. रोज कमावणे रोज खाणे. अशात खासगी शाळांची तीस-तीस हजार रुपये फी कशी भरावी? सोमलवाडातील शाळा बंद करून ती जागा बिल्डरला का विकली गेली? याला आम्ही विरोध करतो. शाळा सुरू झालीच पाहिजे.'' त्यांच्या या प्रस्तावाचे सभेने ठरावात रूपांतरण केले. सामाजिक कार्यकर्ते धीरज भिशीकर यांनी संपूर्ण सभेत प्रस्ताव आणि ठराव नोंदविण्याची जबाबदारी पार पाडली. कमलाबाई वानखेडे, शकुंतलाबाई हाडके यांनीही या ठरावाला अनुमोदन दिले. 

या भागातील नागरिक सुप्रिया शिंदे यांनी "सोमलवाडा शाळा केवळ सुरूच केली पाहिजे असे नाही तर तिथे गुणवत्तात्मक शिक्षणही दिले गेले पाहिजे', असा प्रस्ताव ठेवला. तर, नारायणराव रागीट यांनी "शाळेसाठी आरक्षित जागा असून ले-आउटची नसल्याने ती विकणे बेकायदेशीर आहे. विक्री प्रक्रिया तत्काळ थांबवावी', असा प्रस्ताव ठेवला. "मी याच शाळेत शिकले आणि मोठी झाले. आज मी काहीतरी करू शकले, ते याच शाळेमुळे', असे उद्‌गार साधना श्रीवास्तव यांनी काढले. "सोमलवाडा शाळा सुरू करावी. येथील शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा भार टाकू नये', असा प्रस्ताव साधना श्रीवास्तव यांनी मांडला. या सर्वच प्रस्तावांना नागरिकांनी अनुमोदन दिल्यामुळे त्याचे ठरावात रूपांतरण करण्यात आले. 

मंगेश महाजन, रवी रागीट, राजेश कांबळे, हर्षल शेंदेरे, महेंद्र तितरमारे, सौरभर घोरपडे, अनिकेत तितरमारे, अमर नारायणवार, प्रज्वल शेंडे, आशीष नागवंशी, शुभम शेंदरे, अंकित लांघे, चंद्रशेखर पराड, शेख इशाक, निखिल पिसे, अभिषेख नागपुरे, विलास कंगाले, चेतन वरोकर, राहुल रोकडे, मोहीर उपाध्याय, गोलीसिंग तलवार, विजय शेंडे, देवराव गभणे, कौसल चौधरी, किशोर चन्ने, प्रकाश तितरे, केशव भोले, सुरेश चरडे, अरुण वांजरकर आदी नागरिक उपस्थित होते. "सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समिती'चे दीपक साने, धीरज भिशीकर, सचिन लोणकर, अमोल हाडके, संजय शर्मा, चंद्रशेखर पराडकर, खुशाल ढाक, डॉ. अंकुश बुरंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
 

विद्यार्थी एकत्र येणार 

याच शाळेत अनिल दांडेकर यांनी शिक्षण घेतले. ते मोहल्ला सभेला उपस्थित होते. ते म्हणाले, ""या शाळेत शिकलेले विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर आहेत. ही शाळा वाचविण्यासाठी त्या सर्वांनी एकत्र आले पाहिजे.'' तर, प्रशांत नरवाडे यांनी "कधी काळी या शाळेत एकाच वेळी आठशे-नऊशे विद्यार्थी शिकत होते' अशी माहिती दिली. याच शाळेत शिकलेले अनेक जण मोहल्ला सभेत उपस्थित होते. "या शाळेचे सर्व माजी विद्यार्थी एकत्र येत आम्ही ही शाळ वाचवूच', असा निर्धारही त्यांनी या वेळी केला. 
 


...तर आम्हीच उघडू शाळा 

"कुलूपबंद केलेली ही शाळा तत्काळ उघडावी; अन्यथा आम्ही नागरिकच ती उघडू', असा ठरावही सभेत घेण्यात आला. त्यावर "सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समिती'चे संयोजक दीपक साने यांनी भूमिका मांडली. ""केवळ शाळा उघडून चालणार नाही, तर तिथे उत्तम शिक्षण मिळण्याची हमीही मिळावी. ज्या दुकानात चांगला आणि स्वस्त माल असतो, तिथेच ग्राहक जातात. समजा उत्तम शिक्षण आणि तेही मोफत मिळाले, तर कुणीही आपल्या मुलांना अव्वाच्या सव्वा फी भरत खासगी शाळेत कशाला टाकतील'', असा सवाल त्यांनी केला. 

राजकीय हस्तक्षेप नको 

शिक्षण क्षेत्रात राजकीय पक्षांनी हस्तक्षेप करू नये. कोणत्याही राजकीय व्यक्तीला शिक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देऊ नये. तर, प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतला जावा, असा ठराव विजय निळकंठराव शिंदे यांनी मांडला. तर, केशव भोले यांनी "सोमलवाडा शाळा सुरू करून येथे मातृभाषेसोबतच इंग्रजीतूनही शिक्षण देण्यात यावे', असा ठराव मांडला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com